ICC ODI Ranking: भारताचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी-२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अंतिम सामना झाल्यानंतर दोघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंड दौऱ्याआधी दोघांनी इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत कसोटी क्रिकेटला रामरम ठोकला. दरम्यान बुधवारी (२० ऑगस्ट)आयसीसीकडून वनडे फलंदाजांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही गायब झाल्याचं दिसून आलं आहे.

भारतीय वनडे संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिल या वनडे फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. गिलने आतापर्यंत ७८४ रेटिंग पाँईंट्सची कमाई केली आहे. आठवड्याभराआधी जाहीर करण्यात आलेल्या वनडे फलंदाजांच्या यादीत विराट आणि रोहित दोघांचाही समावेश होता. रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी होता. तर विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानी होता. तर शुबमन गिल ७५६ रेटिंग पाँईंट्ससह अव्वल स्थानी होता.

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत बाबर आझम ७२९ रेटिंग पाँईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण दुसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेले फलंदाज यादीतून अचानक गायब कसे होऊ शकतात? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान सिस्टीममध्ये काही त्रुटी आल्यामुळे या यादीत बदल झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कसोटी आणि टी-२० संघातून बाहेर झालेले विराट आणि रोहित वनडे फॉरमॅटमध्ये अजूनही सक्रिय आहेत.

विराट आणि रोहित हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहेत. दोघेही फेब्रुवारी २०२५ मध्ये शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. हा सामना न्यूझीलंडविरूद्धचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना होता. या सामन्यात फलंदाजी करताना रोहितने दमदार फलंदाजी केली होती. तर दुसरीकडे विराट कोहलीने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

आयसीसी वनडे फलंदाजांची क्रमवारी (१३ ऑगस्ट)

१. शुभमन गिल – भारत – ७८४
२.रोहित शर्मा – भारत – ७५६
३.बाबर आझम – पाकिस्तान – ७५१
४.विराट कोहली – भारत – ७३६
५.डॅरिल मिशेल – न्यूझीलंड – ७२०
६.चरिथ असलंका – श्रीलंका – ७१९
७.हॅरी टेक्टर – आयर्लंड – ७०८
८.श्रेयस अय्यर – भारत – ७०४
९.इब्राहिम झद्रान – अफगाणिस्तान – ६७६
१०.कुसल मेंडिस – श्रीलंका – ६६९