Virat Kohli Stunning Catch Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडेमध्ये कांगारू संघ सर्वबाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम गोलंदाजीसाठी पाचारण केलं. ऑस्ट्रेलियाने सुरूवात चांगली केली पण भारताच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियाची ३ बाद १८३ धावा अशी अवस्था असताना कांगारू संघ २३६ धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान विराट कोहलीने टिपलेला झेल मात्र कमालीचा होता.
सिडनी वनडेमध्ये विराट कोहलीने मॅथ्यू शॉर्टला बाद करण्यासाठी एक जबरदस्त झेल घेतला. कोहलीचा झेल बघताच क्षणी खूप सोपा वाटेल, पण तो झेल बिलकुल साधारण नव्हता. चेंडू विराटच्या दिशेने बुलेटच्या वेगाने आला आणि तो पकडण्यासाठी त्याने आपल्या शरीराचा भाग मागे टाकत उत्कृष्ट झेल टिपला.
मॅथ्यू शॉर्टने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताविरूद्ध वादळी खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आणि परिणामी भारताने मालिकाही गमावली. तिसऱ्या वनडेतही शॉर्ट त्याच्या फॉर्मसह खेळायला उतरला. शॉर्टला झेलबाद करण्यासाठी जबरदस्त कामगिरीची गरज होती, तेच विराट आणि सुंदरच्या जोडीने केलं.
वॉशिंग्टनच्या चेंडूवर शॉर्ट पुल शॉट खेळायला गेला, चेंडू फ्लॅट राहिला व स्क्वेअर लेगवर तैनात असलेल्या विराटच्या दिशेने वायूवेगाने गेला. विराटला एडजस्ट होण्याकरताही वेळही नाही मिळाला आणि त्याने फक्त ०.६७ सेकंदात हा झेल टिपला. विराटच्या या कमालीच्या झेलची सर्वत्र चर्चा होत आहे.
शुबमन गिलची चूक विराटच्या झेलने सावरली
मॅथ्यू शॉर्टने त्याचं खातंही उघडलं नव्हतं. त्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो धाव घेण्यासाठी इतका उत्सुक होता की त्याने मिशेल मार्शचं देखील ऐकलं नाही. जर कर्णधार गिलचा थेट थ्रो विकेटवर लागला असता तर तो धावबाद झाला असता, पण वाचला. शॉर्टला जीवदान मिळालं आणि त्याने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जीवदान मिळाल्यानंतर मॅथ्यू शॉर्टने ४१ चेंडूंचा सामना करताना त्याने २ चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या आणि बाद झाला.
