वृत्तसंस्था, बंगळूरु
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी) संघाच्या पहिल्या ‘आयपीएल’ जेतेपदाच्या जल्लोषावेळी ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर खेळाडूंच्या स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांच्या चेंगराचेंगरीत ११ जण ठार झाले होते. बंगळूरु संघाचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने या घटनेबाबत स्पष्टपणे प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र, आता तीन महिन्यांच्या कालावधीनंतर त्याने आपले मौन सोडले आहे. आमच्यासाठी सर्वांत मोठ्या आनंदाचे दु:खद घटनेत रूपांतर झाल्याचे कोहली म्हणाला.
बंगळूरु येथे ‘आरसीबी’च्या विजय सोहळ्यासाठी साधारण २.५ लाख लोक जमले होते. आपल्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्याच्या नादात चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेनंतरही बंगळूरु संघाचा विजय सोहळा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ठरल्याप्रमाणे संपन्न झाला. यात कोहलीचाही सहभाग होता. त्यामुळे कोहली आणि बंगळूरु संघावर बरीच टीका झाली होती.
‘‘आयुष्यात तुम्हाला काहीही, ४ जूनला जी हृदयद्रावक घटना घडली, त्यासाठी तयार करू शकत नाही. आमच्या फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वांत मोठा आनंद, क्षणात दुःखद घटनेत बदलला. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि जखमी झालेल्या आमच्या चाहत्यांसाठी मी प्रार्थना करत आहे. त्यांचा विचार सतत माझ्या मनात असतो. तुमचे नुकसान आता आमच्या कथेचा एक भाग आहे. आपण आता एकत्रितपणे, एकमेकांचा आदर करून आणि अतिशय जबाबदारीने पुढे जायला हवे,’’ असे बंगळूरु संघाने ‘एक्स’वर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये कोहली म्हणाला.
चेंगराचेंगरीच्या या घटनेची अधिकृतपणे चौकशी करण्यात आली होती. सरकार आणि स्थानिक पोलिसांकडून मंजुरी मिळालेली नसतानाही बंगळूरु संघाने थेट समाजमाध्यमांवरून चाहत्यांना विजय सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याने ही दुर्घटना घडल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले होते. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी बंगळूरु संघाने २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती, तसेच त्यांनी ‘आरसीबी केअर्स’ संस्थेचीही स्थापना केली. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्टेडियम अधिकारी, क्रीडा संस्था आणि लीग भागीदारांबरोबर मिळून ही संस्था काम करेल, असे बंगळूरु संघाकडून सांगण्यात आले होते.