Virat Kohli wants to retire: रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीनेही आता कसोटीतून निवृत्त होण्याची इच्छा बीसीसीआयकडे व्यक्त केली आहे. मात्र बीसीसीआयने विराट कोहलीला त्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले आहे.

द इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटने कसोटीतून निवृत्ती घेण्याचे मन बनविले असून त्याने त्याची इच्छा बीसीसीआयला बोलून दाखवली आहे. मात्र आगामी इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विराटने त्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विचारणी बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. यावर अद्याप विराटने उत्तर दिलेले नाही.

रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर विराट कोहलीनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. पुढील महिन्यात इंग्लंडच्या क्रिकेट संघाबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी संघाची निवड लवकरच करण्यात येणार आहे.

या वर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावसकर चषकानंतर विराटने निवृत्तीचा विचार सुरू केल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या कसोटीत शतक झळकविल्यानंतर विराटला या दौऱ्यात सूर गवसला नव्हता. जर विराटने निवृत्तीचा विचार बदलला नाही आणि आता रोहित शर्माही संघात नाही, त्यामुळे भारताच्या मधल्या फळीत कोण खेळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रोहित आणि विराटच्या अनुपस्थित भारताला दोन अनुभवी खेळाडूंची कमतरता जाणवेल. या दोघांनी जवळपास ११ वर्ष कसोटीत नेतृत्व केले होते. विराट कोहली २०१४ रोजी कसोटी संघाचा कर्णधार झाला होता. तर रोहित शर्माकडे फेब्रुवारी २०२२ रोजी संघाचे कर्णधार पद आले.