Vedant Sehwag Son, Delhi Premier League 2025 Auction: दिल्ली प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी लिलाव सोहळ पार पडला. या लिलावात आयपीएल गाजवलेल्या खेळाडूंसह अनेक युवा खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं. या लिलावातील सर्वात चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मुलगा वेदांत सेहवाग. १४ वर्षीय वेदांत या लिलावातील सर्वात युवा खेळाडू होता. पण या लिलावात कुठल्याही संघाने त्याच्यावर बोली लावलेली नाही.
वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याचा मुलगा फिरकीपटू आहे. विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना त्याने दमदार कामगिरी केली होती. दिल्लीच्या १६ वर्षांखालील संघाकडून खेळताना त्याने ५ सामन्यांमध्ये २४ गडी बाद केले होते. ज्यावेळी त्याचं नाव या लिलावासाठी नोंदवलं गेलं होतं, त्यावेळी वीरेंद्र सेहवागने एक्स अकाऊंवर पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं होतं. त्याने आपल्या मुलाच्या प्रयत्नांचे कौतुक करत हा कुटुंबासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचं म्हटलं होतं.
वेदांत सेहवागचा मोठा भाऊ आर्यवीर सिंगने देखील दिल्लीच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आर्यवीर सिंगने गेल्या हंगामात फलंदाजी करताना २९७ धावा केल्या होत्या. या दमदार फलंदाजीसह तो चर्चेत आला होता. त्याचं नाव या लिलावात अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाही.
दिल्ली प्रीमियर लीगच्या लिलावाला वीरेंद्र सेहवागने देखील हजेरी लावली. त्याला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण कुठल्याही संघाने त्याच्या मुलावर बोली लावलेली नाही. तर दुसरीकडे आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंवर या लिलावात मोठी बोली लावली गेली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा गोलंदाज सुयश शर्मावर १५ लाखांची बोली लावली गेली. तर दिग्वेश राठीवर ३८ लाखांची बोली लावली गेली आहे. तर नितीश राणावर ३४ लाखांची बोली लावली गेली आहे.