आसेंट लुई (अमेरिका) : भारताचा आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने गॅरी कास्पारोवविरुद्ध निर्णायक क्षणी संधी गमावल्याने ‘क्लच’ बुद्धिबळ लढतीच्या दुसऱ्या दिवशी दोन विजय आणि दोन बरोबरीसह कास्पारोवला आपली आघाडी पाच गुणांपर्यंत वाढवली. स्पारोवला पहिला डाव जिंकण्यात यश मिळाले. कारण, आनंद विजय मिळवण्याच्या स्थितीत असतानाही त्याच्या पदरी निराशा पडली. या डावात आनंद वेळेकडे लक्ष देण्यास विसरला आणि त्याचा फटका आनंदला बसला.
दिवसाच्या दोन ब्लिट्झ (अतिजलद) डावांपैकी पहिला डाव कास्पारोवने जिंकला आणि दुसऱ्या दिवशी ८.५-३.५ अशी आघाडी घेतली. हा सामना १२ डावांचा असून यामध्ये अजून चार डाव शिल्लक आहेत. आनंदकडे अजूनही जेतेपद मिळवण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी अखेरच्या दिवशी आनंदला सर्व डावात विजय मिळवावा लागेल.
‘‘पहिल्या डावात एक वेळ माझ्याकडे एक मिनिट २६ सेकंद होते. मात्र, नंतर मला सातत्य राखता आले नाही. मला पुन्हा वेळ पाहायला हवी होती. पण, मी विसरलो,’’ असे आनंदने सांगितले. दुसरा डाव हा बरोबरीत राहिला. मात्र, दिवसाच्या तिसऱ्या डावात आनंदला पराभूत व्हावे लागले. हा सामन्यातील सर्वात छोटा डाव होता. जो केवळ १८ चालीतच संपला. त्यामुळे कास्पारोवला पाच गुणांची आघाडी घेण्यात यश मिळाले