न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या माघार घेण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानमधील क्रिकेटसंबधी वातावरण चांगलेच तापले होते. आता ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौरा करण्यापूर्वी अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष राजा नंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनूसचे वक्तव्य आले आहे. ”ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानात यावे, कारण पाकिस्तान जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक आहे”, असे वकार युनूसने म्हटले.

एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राशी बोलताना वकारने ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिले. वकार म्हणाला, ”पाकिस्तान हा जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक आहे. जेव्हा एखादा देश एखाद्या मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करतो, तेव्हा सुरक्षा वेगळ्या पातळीवर असते. मी आणि माझी पत्नी सिडनीमध्ये राहतो आणि पाकिस्तानही तितकेच सुरक्षित ठिकाणांपैकी एक आहे, आम्ही खात्री देतो की तुमची काळजी घेतली जाईल. आमची सुरक्षा जगातील सर्वोत्तमपैकी एक आहे. जेव्हा एखादा संघ येतो तेव्हा तो एक वेगळा खेळ असतो. ते आतिथ्य सुनिश्चित करतात आणि उत्कृष्ट सुरक्षा आहे.”

हेही वाचा – IPL 2021 : मुंबईला हरवल्यानंतर KKRच्या कप्तानाला बसला जबर फटका! चुकवावी लागणार ‘मोठी’ किंमत

युनूसने २०२० मध्ये पाकिस्तानच्या न्यूझीलंड दौऱ्याची आठवण करून दिली आणि सांगितले, ”त्यावेळी करोना सुरू होता आणि १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहणे कठीण होते पण आम्ही ते स्वीकारले. क्रिकेटला त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतली. लस नसताना आम्ही न्यूझीलंडला गेलो. मी सहभागी झालेल्या सर्वात कठीण दौऱ्यापैकी हा दौरा होता. क्वारंटाइनमधील १४ दिवस खूप वेदनादायक होते.”

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा प्रस्तावित आहे आणि दोन संघांनी दौरा रद्द केल्यानंतर आता सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाकडे आहेत. पीसीबी ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करू नये यासाठी आधीच प्रयत्न करत आहे. मात्र, अनेक एजन्सींच्या सुरक्षेच्या धोक्यांमुळे न्यूझीलंडने दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.