सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघावर ५१ धावांनी मात करुन ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीच्या मैदानावर ३९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३३८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून विराट कोहली, लोकेश राहुल आणि अन्य फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. परंतू अपेक्षित धावगती कायम न राखल्यामुळे टीम इंडियाला ३९० धावांचं डोंगराएवढं आव्हान झेपवलं नाही. कर्णधार विराट कोहलीने या पराभवासाठी भारतीय गोलंदाजांना जबाबदार ठरवलं आहे.

“ऑस्ट्रेलियाने प्रत्येक बाबतीमध्ये आम्हाला धोबीपछाड दिला. माझ्या मते गोलंदाजमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली नाही. जिथे मारा करायचं आम्ही ठरवलं होतं तिकडे मारा झाला नाही आणि ऑस्ट्रेलियाचं बॅटिंग लाईन-अप चांगलं आहे. मैदानाचे अँगल्स आणि वातावरण त्यांना चांगलं माहिती आहे, तिकडे त्यांनी धावा काढल्या. श्रेयस अय्यरची विकेट कलाटणी देणारी ठरली. मी आणि लोकेश राहुल मैदानात असताना ४०-४१ षटकापर्यंत मैदानात टिकून रहायचं ठरवत होतो. शेवटच्या १० षटकांत हार्दिक फटकेबाजी करण्यासाठी समर्थ होता…ज्यामुळे आमचं आव्हान कायम राहिलं असतं. पण महत्वाच्या क्षणी दोन विकेट पडल्यामुळे सामना फिरला.” विराटने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बाजू मांडली.

भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी मैदानावर स्थिरावण्याला प्राधान्य दिला. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोघांना फारसे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. श्रेयस अय्यरला बाद करत हेन्रिकेजने भारताची जोडी फोडली, त्याने ३८ धावा केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलही त्याला चांगली साथ देत होता. ही जोडी मैदानावर कमाल दाखवणार असं वाटत असतानाच हेजलवूडने विराटला माघारी धाडलं, त्याने ८९ धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर ७६ धावा काढून बाद झाला. यानंतर पॅट कमिन्सने एकाच षटकात जाडेजा आणि पांड्याला बाद करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतले फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी २ तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.