आशिया चषक २०२५ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ मायदेशात वेस्टइंडिजविरूद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी वेस्टइंडिजचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेआधी वेस्टइंडिजचा मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीने मोठं वक्तव्य केलं आहे.
भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर दुसरा कसोटी सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीच्या मैदानावर रंगणार आहे. गेल्यावेळी न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता त्यावेळी भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान वेस्टइंडिजचा मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीला आपल्या संघाला न्यूझीलंड संघाकडून प्रेरणा घेण्यास सांगितलं आहे.
डॅरेन सॅमीने मुलाखतीत म्हटले की, “आम्ही सध्या अशा स्थितीत आहोत, जिथे आमचे वेगवान गोलंदाज कुठल्याही परिस्थितीत २० गडी बाद करू शकतात. आमच्याकडे ४ वेगवान गोलंदाज आहेत. चारही गोलंदाजांची गोलदांजी क्षमता ही वेगवेगळी आहे. आमच्या गोलंदाजी आक्रमणात विविधता आहे. “
भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या मालिकेआधी वेस्टइंडिजने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज म्हणून शमार जोसेफ, अँडरसन फिलिप, जेडन सील्स आणि अल्जारी जोसेफ यांना संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजांबद्दल बोलताना सॅमी म्हणाला, “आमच्याकडे शमार जोसेफ आहे, जो कौशल्यपूर्ण गोलंदाज आहे. जेडनकडे चेंडू दोन्ही बाजूंना स्विंग करण्याची क्षमता आहे. आमच्याकडे अल्जारी जोसेफ आहे, जो उंच गोलंदाज आहे. उंच असल्यामुळे त्याला उसळी चांगली मिळते. अशाप्रकारे भारतात खेळताना आमच्याकडे २० गडी बाद करण्याची क्षमता आहे.”
या दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन (उपकर्णधार), केवलन अँडरसन, एलिक अथानाजे, जॉन कँपबेल, तेगनारायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्ह्स, शाई होप, टेविन इमलाच, अल्जारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खारी पियरे, जायडन सील्स.