West Indies World Record in ODI: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. हा सामना ढाका येथे सुरू आहे. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासह वेस्ट इंडिजने गोलंदाजीने सामन्याला सुरूवात केली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्स गमावत २१३ धावा केल्या. पण यादरम्यान वेस्ट इंडिज संघाने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
बांगलादेशने वेस्ट इंडिजला विजयासाठी २१४ धावांचं लक्ष्य दिलं आहे. तत्पूर्वी बांगालदेशच्या सर्व फलंदाजांनी धावसंख्येत योगदान दिलं. सैफ हसन ६ धावांवर बाद झाल्यानंतर सौम्य सरकारने ४५ धावांची खेळी केली. याशिवाय मेहदी हसन मिराजने २१ तर रिशाद हुसैनने ३९ धावा केल्या. याशिवाय सर्व फलंदाजांनी १५-२० धावा करत योगदान दिलं आणि संघाची धावसंख्या २१३ पर्यंत नेली.
वेस्ट इंडिजने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी कोणत्याही संघाने केलेला नाही. संघाकडून गुडाकेश मोतीने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या, तर अॅलिक अथानाझे आणि अकील हुसेन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाला असा विक्रम
बांगलादेशच्या डावात, वेस्ट इंडिजने सर्व ५० षटकं केवळ फिरकी गोलंदाजांसह टाकली. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात असा पराक्रम पहिल्यांदाच झाला आहे. यासह वेस्ट इंडिज संघाने हा वर्ल्ड रेकॉर्ड ही आपल्या नावे केला आहे. कॅरिबियन कर्णधार शे होपने ५० षटकं टाकण्यासाठी पाच गोलंदाजांना गोलंदाजी दिली, प्रत्येकाने १० षटकांचा स्पेल टाकला. अकिल हुसेन, रोस्टन चेस, खारी पियरे, गुडाकेश मोती आणि अथानाझे यांनी मिळून ५० षटकं टाकली. वेस्ट इंडिजचे हे सर्व गोलंदाज फिरकीपटू आहेत.
वेस्ट इंडिजचे फिरकी गोलंदाज
अकिल हुसैन – १० षटकं – १ मेडन ओव्हर – ४१ धावा – २ विकेट्स
रॉस्टन चेस – १० षटकं – २ मेडन ओव्हर्स
खॅरी पियरे – १० षटकं – ४३ धावा
गुडाकेश मोती – १० षटकं – ६ धावा – ३ विकेट्स
एलिक अथानाझे – १० षटकं – ३ मेडन ओव्हर – १४ धावा – २ विकेट्स
१८ ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ७४ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर वेस्ट इंडिजसाठी हा दुसरा सामना महत्त्वाचा असणार आहे. मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पाहुण्या संघाला विजय आवश्यक आहे.