भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) एकीकडे आयपीएलचा ‘उदो उदो’ करत असले तरी रविवारपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी यजमान आणि धनाढय़ मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) बेफिकीरपणा पाहायला मिळाला. गुजरात-महाराष्ट्र यांच्यामधील पहिला सामना बीकेसीवर खेळवण्यात आला होता. तिथे प्रसारमाध्यमांसाठी पत्र्याच्या शेडचा एक तंबू बांधून दिला होता, पण अन्य कसलीही व्यवस्था नव्हती. तिथून नंतर प्रसारमाध्यमांना गुणलेखकांच्या बाजूला नेण्यात आले, पण एमसीएच्या सदस्यांनी प्रसारमाध्यमांना हटकले. त्यानंतर एका टेबलावर चार खुच्र्यासह प्रसारमाध्यमांची व्यवस्था करण्यात आली. रणरणत्या उन्हात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची फक्त पाण्यावरच बोळवण करण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर मुंबई-बडोदा सामन्याच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पत्रकार कक्ष बंद ठेवण्यात आला होता. एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी पत्रकारांची कॉर्पोरेट कक्षात व्यवस्था केल्याचे सांगितले. अखेर एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना जाग आल्यानंतर गुणलेखकांच्या पाठीमागे प्रसारमाध्यमांची सोय करण्यात आली. सोमवारपासून वानखेडेवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची योग्य व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन एमसीएकडून देण्यात आले.
संदीप पाटील, जॉन राइट यांची हजेरी
या स्पर्धेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीएच्या मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्याला राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपस्थिती लावली होती. सामन्याचा आनंद लुटत त्यांनी काही जणांशी चर्चाही केली. भारताचे माजी प्रशिक्षक आणि मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक जॉन राईट यांनी हा सामना आवर्जून पाहिला. सामना संपल्यावर त्यांनी युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी चर्चा केली.