World Championship Of Legends: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू पुन्हा एकदा मैदनावर खेळताना दिसून येणार आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सचा दुसरा हंगाम आजपासून सुरु होणार आहे. यावेळी या हंगामातील सर्व सामने इंग्लंडमध्ये खेळवले जाणार आहेत. या हंगामात इंडिया चॅम्पियन्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी युवराज सिंगकडे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत एकूण ६ संघ खेळणार आहेत. या ६ संघांमध्ये १८ सामने खेळवले जातील. हे सामने इंग्लंडमधील ४ मैदानावर खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील मुख्य आकर्षण इंडिया चॅम्पियन्स विरूद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात होणारा सामना असणार आहे. हा सामना २० जुलैला रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना १८ जुलैला इंग्लंड चॅम्पियन्स विरूद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना बर्मिंघमच्या एजबस्टन मैदानावर रंगणार आहे.
या स्पर्धेतील दुसऱ्या हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले एकापेक्षा एक स्टार खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. इंडिया चॅम्पियन्स संघाकडून युवराज सिंग, सुरेश रैना, शिखर धवन, हरभजन सिंग आणि रॉबिन उथप्पा हे खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिविलियर्स पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघाकडून ख्रिस लिन, पीटर सीडल, ब्रेट लीसारखे अनुभवी खेळाडू खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
या स्पर्धेचा फॉरमॅट सोपा आहे. सर्व ६ संघांना एकमेकांविरूद्ध १-१ सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. ग्रुपमध्ये टॉप ४ मध्ये असलेले संघ सेमीफायनलचा सामना खेळतील. २ ऑगस्टला या स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे.
ही स्पर्धा लाईव्ह कुठे पाहता येणार?
या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. या स्पर्धेतील सामने भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सुरू होतील. ज्या दिवशी या स्पर्धेत डबल हेडरचे सामने असतील, त्यादिवशी पहिला सामना संध्याकाळी ५ वाजता आणि दुसरा सामना रात्री ९ वाजता सुरू होईल. हे सामने तुम्ही फॅनकोडवरही लाईव्ह पाहता येऊ शकतात.