Team India Full ODI Schedule Till 2027 ODI World Cup: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं. ही मालिका भारताने १-२ ने गमावली. पण तिसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी २३७ धावांचा पाठलाग करताना नाबाद १६८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला.
विराट आणि रोहितने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे दोघे केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना झाल्यानंतर दोघेही ७ महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरले होते. पुनरागमन केल्यानंतर दोघांनाही हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. विराट कोहली सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये शून्यावर माघारी परतला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर दुसरीकडे रोहित शर्मा पहिल्या सामन्यात अवघ्या ८ धावांवर माघारी परतला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक आणि मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दमदार शतकी खेळी केली. ही मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघ ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र विराट आणि रोहित या संघाचा भाग नसणार आहेत. दरम्यान विराट-रोहित पुन्हा मैदानात केव्हा उतरणार?जाणून घ्या.
विराट आणि रोहितला २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. दोघांनी आपली तयारी देखील दर्शविली आहे. विराट कोहली इंग्लंडमध्ये सराव करताना दिसून आला होता. तर रोहितने मुंबईत कसून सराव केला. ७ महिन्यांनंतर पुनरागमन करून सुद्धा, दोघांनी वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी तयार आहोत, हे दाखवून दिलं आहे. वर्ल्डकपआधी रोहित आणि विराटला फार सामने खेळण्याची संधी मिळणार नाही. दरम्यान विराट आणि रोहित इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसारख्या मजबूत संघांविरूद्ध खेळताना दिसून येणार आहेत.
विराट- रोहित पुन्हा मैदानात केव्हा उतरणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, ३ वनडे
पहिला वनडे सामना – ३० नोव्हेंबर, रांची
दुसरा वनडे सामना -३ डिसेंबर, रायपूर
तिसरा वनडे सामना- ६ डिसेंबर, विशाखापट्टणम
भारत विरूद्ध न्यूझीलंड, ३ वनडे
पहिला वनडे सामना- ११ जानेवारी, वडोदरा
दुसरा वनडे सामना- १४ जानेवारी, राजकोट
तिसरा वनडे सामना- १८ जानेवारी, इंदौर
भारत विरूद्ध इंग्लंड, ३ वनडे
पहिला वनडे सामना- १४ जुलै, बर्मिंघहॅम
दुसरा वनडे सामना- १६ जुलै, कार्डिफ
तिसरा वनडे सामना – १९ जुलै, लॉर्ड्स
