Yuvraj Singh on his son: नुकत्याच झालेल्या आशिया चषकात भारताचा तडाखेबाज फलंदाज अभिषेक शर्माने दिमाखदार कामगिरी केली. पंजाबचा असलेला अभिषेक शर्मा हा युवराज सिंगला आपला आदर्श मानतो. युवराज सिंगकडून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे त्याने अनेकदा सांगितले. तसेच आता पंजाबचाच प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनाही युवराज सिंग धडे देत असल्याची मध्यंतरी बातमी आली होती. इतरांना प्रेरणा देणाऱ्या युवराजने स्वतःच्या मुलाला मात्र क्रिकेटपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. याचे कारण त्याने स्वतःच एका मुलाखतीत दिले.

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हेदेखील भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत. युवराजने २०१६ साली बॉलिवूड अभिनेत्री हेजल किचशी लग्न केले. त्यांना ओरियन नावाचा मुलगा तर ऑरा नावाची मुलगी आहे. युवराजने एका जुन्या मुलाखतीत म्हटले की, माझ्या मुलांचे संगोपन करत असताना मला माझ्या वडिलांपेक्षा वेगळं काही करायचं आहे. तसेच मी माझ्या मुलाला क्रिकेटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

विश्वचषक जिंकल्यानंतर त्याच्या वडिलांना कसे वाटले? असा प्रश्न रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये युवराज सिंगला विचारण्यात आला होता. यावर युवराज म्हणाला, “ते (वडील) स्वतःची कपिल देव यांच्याशी तुलना करायचे. ते मला म्हणायचे, १९८३ साली कपिल देवच्या हातात विश्वचषकाचा करंडक होता, तेव्हा माझ्या हातात तू (युवराज) होतास.” मला हे अपमानास्पद वाटायचं. पण जेव्हा मी २०११ चा विश्वचषक जिंकला, तेव्हापासून त्यांना समाधान वाटलं.

माझ्या मुलाबरोबर मला ते होऊ द्यायचे नाही

माझ्या मुलालाही क्रिकेट खेळण्यास उद्युक्त करावे, असे ते (योगराज) सांगत असतात. पण मी त्यांना सांगतो की, याला याचे आयुष्य जगू द्या. याचे कारण असे की, माझे वडील माझ्याशी नेहमी कोचसारखे वागायचे. ते वडिलांसारखे क्वचित वागायचे. माझ्या मुलाबरोबरही हेच व्हावे, असे मला वाटत नाही. मला फक्त त्याचे वडील व्हायचे आहे.

सप्टेंबर महिन्यात कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीमध्येही युवराज सिंगने त्याच्या वडिलांशी असलेल्या संबंधाबाबत भाष्य केले होते. वडिलांबाबत बोलताना युवराज म्हणाला की, ते (वडील) कधीकधी कठोर असायचे. त्यांचे स्वप्न मी जगतोय, हे मला समजले होते. माझ्यावर कधी कधी दबाव यायचा. पण त्यामुळेच मी १८ वर्षांचा असताना भारतासाठी खेळायला सुरुवात केली.

Yuvraj Singh and Family
युवराज सिंग, पत्नी हेजल किच आणि वडील योगराज सिंग हे लहान मुलांबरोबर…

युवराज सिंग पुढे म्हणाला की, हेच पुन्हा तो त्याच्या मुलाबरोबर करू इच्छित नाही. तो ओरियनबरोबर असे क्षण घालवतो, जे त्याला त्याच्या वडिलांबरोबर घालवायला आवडले असते.

युवराज सिंग एक उत्तम वडील असल्याचे पत्नी हेजलनेही अनेकदा सांगितले आहे.