नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी जय शहा यांनी अर्ज भरला आणि ते निवडून आले, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) सचिव म्हणून त्यांची जागा कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘आयसीसी’च्या नव्या अध्यक्षांचा कार्यकाळ १ डिसेंबरपासून सुरू होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २७ ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. जय शहा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार का, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी ‘आयसीसी’ मंडळातील १६ पैकी १५ सदस्यांचा त्यांना पाठिंबा असल्याची माहिती आहे.

‘बीसीसीआय’चे सचिव म्हणून शहा यांचा सध्या सलग दुसरा कार्यकाळ सुरू असून आणखी एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, ‘आयसीसी’मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास शहा यांना ‘बीसीसीआय’मधील आपले पद सोडावे लागेल. तसे झाल्यास त्यांची जागा कोण घेऊ शकेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा >>>Paralympics 2024 : पॅरालिम्पिक कधी पासून सुरू होणार, किती भारतीय खेळाडूंचा असणार सहभाग? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर

नव्या चेहऱ्याला संधी?

‘बीसीसीआय’मध्ये अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष यांच्याकडे सर्वाधिक अधिकार असतात. ज्या व्यक्ती ‘बीसीसीआय’मध्ये आधीपासूनच कार्यरत आहेत, त्यांना मागे टाकून एखाद्या नव्या चेहऱ्याला या तीनपैकी एखाद्या पदावर संधी मिळण्याची शक्यता फार कमीच आहे, असे ‘बीसीसीआय’च्या एका माजी सचिवाकडून सांगण्यात आले. मात्र, मुळात जय शहा ‘आयसीसी’मध्ये जाण्यास उत्सुक आहेत का, हे आधी पाहावे लागेल. त्यांनी आता अर्ज करणे टाळले, तरी भविष्यातही त्यांना ही संधी मिळू शकेल. त्यामुळे ते घाईने कोणताही निर्णय घेतील असे मला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्ला, शेलार शर्यतीत?

‘बीसीसीआय’ सचिवपदासाठी सध्याचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष आशीष शेलार आणि ‘आयपीएल’चे अध्यक्ष अरुण धुमल हे प्रमुख दावेदार असू शकतील. शुक्ला हे सध्या उपाध्यक्ष असल्याने वर्षभरासाठी सचिवपद सांभाळणे त्यांना सर्वांत सोपे जाईल असा अंदाज आहे. तसेच सहसचिव देवजित सैकिया हेसुद्धा शर्यतीत असू शकतील. युवा प्रशासकांमध्ये दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली, बंगाल क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अविषेक दालमिया, पंजाबचे दिलशेर खन्ना, गोव्याचे विपुल फडके आणि छत्तीसगडचे प्रभतेज भाटिया यांची नावेही चर्चेत येऊ शकतील.