पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतीय संघातील खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी वर्ल्डकपविजेत्या संघाचं भरभरून कौतुक केलं. तुमच्या देदिप्यमान यशामुळे मुलींना खेळण्यासाठी प्रेरणा मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या संवादादरम्यान पंतप्रधानांना एक वेगळाच प्रश्न विचारून हरलीन देओलने लक्ष वेधून घेतले.

हरलीनने पंतप्रधानांना तुमची स्किनकेअर ट्रीटमेंट काय आहे असं विचारलं? या प्रश्नावर उपस्थितांध्ये हास्याची लाट उमटली. यावर पंतप्रधानांनी हसत सांगितलं की, ‘आरशाकडे माझं फारसं लक्ष जात नाही. स्नेह राणाने सांगितलं की कोट्यवधी देशवासीयांचं प्रेम आणि पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे. त्याचं बळ तुमच्या चेहऱ्यावर दिसतं’.

यावर पंतप्रधान म्हणाले, ‘जनतेचं प्रेम नेहमीच बळ देणारं असतं. सरकार म्हणून काम करायला लागून २५ वर्ष झाली आहेत. हा खूप मोठा कालावधी आहे. लोकांच्या आशिर्वादाचा प्रभाव खूप मोठा असतो’.

यावर संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी गंमतीत सांगितलं की, प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारून दोन वर्ष झाली. माझे केस पांढरे झाले आहेत’.

तुमच्या संघात सगळ्यांना हसवणारा कोण आहे असं पंतप्रधानांनी विचारलं. यावर वेगवान गोलंदाज क्रांती गौडने जेमिमाचं नाव सांगितलं. यावर जेमिमाने हरलीनचं नाव घेतलं. संघ एकत्र ठेवण्यात हरलीनची भूमिका महत्त्वाची आहे असं जेमिमा म्हणाली. ‘संघात एखादा खेळाडू असायला हवा जो वातावरण हलकंफुलकं ठेवेल असं मला वाटतं. मला सगळ्यांशी बोलायला आवडतं. त्यामुळे मी बोलत राहते. आजूबाजची मंडळी आनंदी असली की मला छान वाटतं’, असं हरलीनने सांगितलं.

इथे आल्यानंतरही काही मजामस्ती केली असेल ना? असं पंतप्रधानांनी हसत विचारलं. यावर तिथे गेल्यावर शांत राहा असं सांगण्यात आल्याचं हरलीनने सांगितलं. यापुढे तिने विचारलं, तुमचं स्कीनकेअर रूटीन जाणून घ्यायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे.

थोड्या वेळानंतर चर्चेचा ओघ क्षेत्ररक्षणाच्या दिशेने वळला. तुमच्यापैकी एकीचा झेल व्हायरल झाला होता. तो व्हीडिओ मी रीट्वीट देखील केला होता असं पंतप्रधान म्हणाले. इंग्लंडविरुद्ध तो झेल हरलीननेच टिपला होता. हरलीन त्यासंदर्भात म्हणाली, ‘इंग्लंडमध्ये खेळत होतो. या सामन्यात काही मिनिटं आधी मी झेल सोडला होता. त्यावेळी कर्णधार हरमनप्रीत ओरडली होती. असे झेल पकडण्याचा सराव आम्ही केला होता. पण तो झेल सुटला. जेमिमा माझ्या जवळच क्षेत्ररक्षण करत होती. तिने मला प्रोत्साहन दिलं. तू असा झेल टिपू शकतेस असं ती म्हणाली. दोन षटकं बाकी आहेत, मी तुला एक अफलातून झेल टिपून दाखवतो. त्यानंतर हा चेंडू माझ्या दिशेने आला आणि झेल पकडला’.

चॅलेंजच्या माध्यमातून हा झेल टिपलास तर अशा शब्दांत पंतप्रधानांनी हरलीनच्या त्या झेलचं कौतुक केलं.

२७वर्षीय हरलीन अष्टपैलू खेळाडू आहे. मधल्या फळीत फलंदाजीच्या बरोबरीने ती उपयुक्त अशी गोलंदाजीही करतो. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तिला भारतासाठी खेळायची संधी मिळाली. योगायोग म्हणजे हरमनप्रीतला झालेल्या दुखापतीमुळे हरलीनला सांधी मिळाली. टी२० चॅलेंज स्पर्धेत तिने तिच्या बॅटची ताकद दाखवून दिली. २०२१ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर तिने घेतलेला झेल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र फलंदाजी क्रमात सातत्याने बदल होत असल्यामुळे ती संघात स्थिरावू शकली नाही.

गेल्या वर्षी हरलीनने दमदार कामगिरीसह वनडे संघात तिसरा क्रमांक आपलासा केला. वेस्ट इंडिजविरुद्ध बडोदा इथे खेळताना हरलीनने खणखणीत शतकी खेळी साकारली. वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाने ४० लाख रुपये खर्चून तिला ताफ्यात दाखल केलं होतं.

वर्ल्डकप स्पर्धेत, हरलीनने श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत ४८ धावांची खेळी केली. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध तिने ४६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३ तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३८ धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध ती २४ धावांवर बाद झाली. उर्वरित सामन्यात तिला अंतिम अकरात खेळायची संधी मिळाली नाही.