उत्तम तंत्र, वेगवान आणि फिरकीपटूंचा सामना करण्याची क्षमता, स्वत:ची खेळी साकारताना भागीदारी रचण्याची हातोटी, चांगला क्षेत्ररक्षक अशी सगळी कौशल्यं भात्यात असलेल्या डावखुऱ्या मॅट रेनशॉला २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाने पदार्पणाची संधी दिली. माईक हसीचा वारसा चालवू शकेल असा कार्यकर्ता मिळाल्याची खात्री काहींना वाटली. मात्र त्याची कारकीर्द बहरलीच नाही. म्हणूनच रविवारचा दिवस मॅट रेनशॉसाठी अतिशय महत्त्वाचा. टेस्ट पदार्पणानंतर वनडे पदार्पण करण्याची संधी रेनशॉला जवळपास १० वर्षांनी मिळाली.
२४ नोव्हेंबर २०१६ रोजी अॅडलेड इथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रेनशॉने टेस्ट पदार्पण केलं होतं. त्यानंतर वनडे पदार्पण करायला १९ ऑक्टोबर २०२५चा दिवस उजाडला. रेनशॉने पदार्पणाच्या लढतीत १० आणि नाबाद ३४ धावांची खेळी केली. दुसऱ्याच सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध ७१ धावांची चांगली खेळी केली. त्याच मालिकेत सिडनी इथे रेनशॉने १८४ धावांची दमदार खेळी साकारली. भारत दौऱ्यात पुण्यात आव्हानात्मक खेळपट्टीवर रेनशॉने ६८ आणि ३१ धावा केल्या. हाच फॉर्म कायम राखत त्याने बंगळुरूत ६० धावा केल्या. यानंतर रेनशॉच्या बॅटचा बहर ओसरला तो कायमचाच. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीने त्याच्यावर विश्वास ठेवला. सलामीला खेळताना अपयश येत असल्याने निवडसमितीने त्याला पाचव्या-सहाव्या क्रमांकावर खेळवायला सुरुवात केली. मात्र तिथेही अपयश येत गेल्याने त्याला संघातून डच्चू देण्यात आला. शेफील्ड स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने २०२३ मध्ये त्याला पुनरागमनाची संधी देण्यात आली. मात्र तीन कसोटीत त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि पुन्हा डच्चू देण्यात आला. त्यालाही अडीच वर्ष होतील.
सँडपेपर गेट प्रकरणात डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट दोषी आढळल्यानंतर रेनशॉला संधी मिळेल अशी चिन्हं होती. इंग्लिश काऊंटी संघ सॉमरसेट साठी खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. वॉर्म अप सामन्यात त्याच्या डोक्याला चेंडू बसला. खेळण्यासाठी फिट असूनही त्याची संघात निवड करण्यात आली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली मात्र अंतिम अकरात त्याला स्थान मिळालं नाही. यथावकाश क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या करारबद्ध खेळाडूंच्या सूचीतूनही त्याचं नाव वगळण्यात आलं.
मात्र यादरम्यान रेनशॉ ऑस्ट्रेलियातील डोमेस्टिक स्पर्धेत खेळत राहिला. बिग बॅश स्पर्धेतही त्याने बॅटची चुणूक दाखवली. ऑस्ट्रेलिया ए संघातर्फे खेळताना रेनशॉने श्रीलंका ए विरुद्ध शतकी खेळी साकारली होती. २०२१ पासून रेनशॉने ४८.६८च्या सरासरीने धावा करताना ७ शतकी खेळी केल्या आहेत. टी२० प्रकारातही मधल्या फळीतील उपयुक्त फलंदाज म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. क्वीन्सलँडसाठी खेळताना सलामीला येत चांगली कामगिरी करणाऱ्या रेनशॉचा अॅशेस मालिकेसाठी उस्मान ख्वाजाचा सहकारी म्हणूनही विचार होऊ शकतो. २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळालं होतं मात्र अंतिम अकरात त्याचा समावेश करण्यात आला नाही.
क्वीन्सलँडचा संघ सहकारी मार्नस लबूशेनला वनडे संघातून वगळण्यात आल्याने रेनशॉला संधी देण्यात आली आहे. योगायोग म्हणजे कॅमेरुन ग्रीन दुखापतीतून न सावरल्याने लबूशेनचाही वनडे संघात समावेश करण्यात आला. २९वर्षीय रेनशॉला ऑस्ट्रेलियाचं वनडेत प्रतिनिधित्व करायची संधी उशिरा मिळत असली तरी त्याच्यासमोर माईक हसीचं उदाहरण आहे. तिशीत संधी मिळाल्यानंतरही हसीने महत्त्वपूर्ण आणि निर्णायक खेळी साकारल्या होत्या.