Pakistan Cricket Board Mohsin Naqvi : आशिया चषक टी-२० स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास नकार दिला. एकीकडे भारतीय संघ आपल्या भूमिकेवर ठाम असताना दुसरीकडे विजयी चषक माझ्याच हस्ते दिला जाणार असा हट्ट मोहसीन यांनी धरला होता. या गोंधळामुळे पारितोषिक वितरण समारंभाला एक तासाहून अधिक विलंब झाला. अखेरीस भारतीय संघाने ट्रॉफीविनाच आनंद साजरा केला आणि स्पर्धेची सांगता झाली. दरम्यान, कोण आहेत मोहसीन नक्वी? भारतीय खेळाडूंनी त्यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास नकार का दिला? नक्वी यांनी भारताविरोधात काय पोस्ट केल्या होत्या? त्यासंदर्भातील हा आढावा…
कोण आहेत मोहसीन नक्वी?
मोहसीन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबीचे) अध्यक्ष आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. क्रिकेट व्यवस्थापनातील कोणताही अनुभव नसतानाही त्यांना हे पद देण्यात आले होते. पुढे आशियाई क्रिकेट परिषदेच्या प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली. प्रशासकीय आणि कॉर्पोरेट पार्श्वभूमीमुळे मोहसीन यांच्याकडे पाकिस्तानमध्ये प्रतिष्ठित व्यक्तीमत्व म्हणून पाहिले जाते. २८ ऑक्टोबर १९७८ रोजी लाहोरमध्ये जन्मलेल्या नक्वी यांनी गव्हर्नमेंट कॉलेज युनिव्हर्सिटी येथून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्याशिवाय अमेरिकेतून त्यांनी मीडिया सायन्सेन या विषयात पदवी मिळवली आहे. सुरुवातीला मोहसीन यांनी ‘सीएएन’मध्ये प्रोड्यूसर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. २००९ मध्ये त्यांनी सिटी मीडिया ग्रुपची स्थापना करून पाकिस्तानमध्ये सहा वृत्तवाहिन्या आणि एक वृत्तपत्र सुरू केले. २२ जानेवारी २०२४ रोजी मोहसीन यांच्याकडे पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर ते आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुखही झाले.
मोहसीन नक्वी यांची अश्लाघ्य कृती
आशियाई क्रिकेट परिषदेकडून (एसीएसी) दर दोन वर्षांनी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत जेतेपद मिळवणाऱ्या संघाला एसीएसीच्या अध्यक्षांकडून पारितोषिक वितरण केले जाते. भारतीय संघाने मोहसीन यांच्याकडून जेतेपद स्वीकारण्यास नकार देण्यामागे काही कारणे समोर आली आहे. यापूर्वी २१ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बंदुक सेलिब्रेशन केले होते. तर गोलंदाज हरिस रौफने क्षेत्ररक्षण करत असताना वादग्रस्त हातवारे करून दाखवले होते. त्यांची ही कृती पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात असल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवर चौहोबाजूंनी टीका झाली. विशेष बाब म्हणजे त्यावेळी मोहसीन नक्वी यांनीही या वादात उडी घेतली होती. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आंतरराष्ट्रीय फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोतून नक्वी यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.
फायनल सामन्यापूर्वीही केली होती पोस्ट
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीच तणावपूर्ण झालेले असताना मोहसीन यांनी त्यात आणखी तेल ओतण्याचे काम केले. दुबई येथील फायनल सामन्याआधीही त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून पाकिस्तानी खेळाडूंचा फोटो शेअर केला होता. या फोटोंमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान अली आगा, जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी अन् हारिस रौफ याच्यासह अन्य खेळाडूंना फायटर जेटच्यासमोर फ्लाइट सूटमध्ये दाखवण्यात आले होते. याच पोस्टमुळे भारतीय खेळाडूंना राग अनावर झाल्याचे सांगितले जाते.
खेळ आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या आहे असे म्हणत भारतीय खेळाडूंनी मनावर दगड ठेवून पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यास होकार दिला होता. मात्र, मोहसीन नक्वी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून राजकीय गोष्टीवर भर दिला. यादरम्यान मोहसीन यांच्याकडून विजेतेपद स्वीकारले तर त्याचा अर्थ त्यांच्या चितावणीखोर पोस्टचे समर्थक दिल्याचा प्रकार होईल हीच गोष्ट भारतीय खेळाडूंनी कदाचित लक्षात घेतली, असे बीबीसीआयमधील एका सूत्राने सांगितले. दरम्यान, २०२५ चा आशिया चषक अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरोधात तीन सामने खेळले. या तिन्ही सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही.
रविवारी दुबईच्या मैदानावर काय घडले?
पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केल्यानंतर भारतीय संघ दुबईच्या मैदानावर आनंद साजरा करत होते. दुसरीकडे सामना संपून जवळपास तासाभरचा कालावधी लोटल्यानंतरही पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममधून बाहेर आले नाही. प्रोटोकॉलनुसार आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना पारितोषिक वितरण करायचे होते, पण ते एकटेच व्यासपीठावर उभे होते. जवळपास ५५ मिनिटांनंतर अखेर सलमान आगा आणि त्याचे सहकारी मैदानावर आले. मात्र, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वी यांच्याकडून जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास नकार दिला. फक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपापली वैयक्तिक पारितोषिकं घेतली, पण भारतीय संघाने एकत्रितपणे ट्रॉफी घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी व्यासपीठावर पाऊल ठेवले नाही. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सायमन डुल यांनी भारतीय संघ आज रात्री आपले पारितोषिक स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले. भारतीय संघाच्या या भूमिकेचे क्रीडाप्रेमींनी स्वागत केले असून पाकिस्तानमधून संताप व्यक्त केला जात आहे.