Ravi Shastri On Shubman Gill: भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या अनुभवी खेळाडूंनी कसोटी आणि टी -२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी युवा खेळाडूंवर आहे. भारताकडून खेळताना अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी केली. तर दुसरीकडे यशस्वी जैस्वालही कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे. दरम्यान आता रवी शास्त्री यांनी भारताचा रायसिंग स्टार कोण? याबाबत मोठा खुलासा केला आहे.
स्काय स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनेलवर क्रिकेट चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना रवी शास्त्री यांना, भारताचा रायसिंग स्टार कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना ते त्यांनी भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलचं नाव घेतलं. यासह भविष्यवाणीही केली की, तो दीर्घ काळ भारतीय संघात टिकून राहू शकतो.
काय म्हणाले रवी शास्त्री?
रवी शास्त्री म्हणाले, “ शुबमन गिल असा खेळाडू आहे जो दीर्घ काळ भारतीय संघात टिकून राहू शकतो. तो अवघ्या २५ वर्षांचा आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत दमदार फलंदाजी केली. त्याच्या नेतृत्वात आणखी सुधारणा होईल. त्याच्याकडे मोठी खेळी करण्याचं कौशल्य आहे.”
भारताचा कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटला रामराम करण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतीय कसोटी संघाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत फलंदाजी करताना त्याने १० डावात ७५४ धावा केल्या. यासह या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या गिलला टी -२० संघात पुनरागमन करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते. गेल्या ३ टी -२० मालिकांमध्ये त्याला विश्रांती देण्यात आली होती.