इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ सध्या विश्रांती घेत आहे. यानंतर टीम इंडिया आशिया चषक २०२५ साठी सज्ज होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. दरम्यान आता या स्पर्धेसाठी शुबमन गिलचा फक्त टी-२० संघातच नाही तर नेतृत्त्व गटात समावेश होणार असल्याचे म्हटले जात आहे.

शुबमन गिल भारताच्या मागील बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन टी-२० मालिकांमध्ये संघाचा भाग नव्हता. पण तरीही आता आशिया चषकासाठी टी-२० संघात फक्त फलंदाज म्हणून नाहीतर कर्णधार म्हणून गिलचं पुनरागमन होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

निवड समितीने गिलला भारताच्या टी-२० संघात परत घेण्याचा गांभीर्याने विचार करण्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, गेल्या वर्षी जूनमध्ये टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर कधीच पूर्ण ताकदीनिशी निश्चित टी-२० संघ निवडलेला नाही. गिल त्या संघाचा भाग नव्हता पण वर्ल्डकप विजयानंतर लगेचच झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या युवा संघाचा कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली. श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिकेत तो भारताचा उपकर्णधारही होता परंतु इतर फॉरमॅटचा प्रामुख्याने कसोटी क्रिकेटची जबाबदारी वाढल्याने निवडकर्त्यांनी गिलला टी-२० फॉरमॅटपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला.

गिलच्या अनुपस्थितीत गेल्या ३ टी-२० मालिकांमध्ये, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी सलामी देताना शतकं झळकावली. इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत तुलनेने अननुभवी संघाचा कर्णधार म्हणून गिलने केलेली कामगिरी पाहता, त्याला इतर कोणत्याही फॉरमॅटपासून दूर ठेवणं कठीण जाणार होतेअसणार आहे, विशेषतः जेव्हा आशिया कपसारख्या महत्त्वाची स्पर्धा समोर आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, निवडकर्ते आणि सर्व निर्णय घेणारे व्यक्ती सर्व फॉरमॅटसाठी एकच कर्णधार असावा या बाजूने आहेत. सूर्यकुमार यादवने फलंदाज म्हणून किंवा टी-२० मध्ये कर्णधार म्हणून सातत्याने चांगलीच कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याच्या जागी बदली कर्णधाराची नियुक्ती करण्याचे कोणतेही कारण नसणार आहे. परंतु गिलचा आशिया चषकसाठी नेतृत्त्व गटात समावेश करण्यात येणार असल्याचं निश्चित आहे.

शुबमन गिल आशिया चषक २०२५ साठी भारताच्या टी-२० संघाचा उपकर्णधार होऊ शकतो. गिल नेतृत्त्व आणि त्याहून पुढे इंग्लंड दौऱ्यावर केलेल्या सर्वाधिक ७५४ धावा निवडकर्त्यांच्या सर्व फॉरमॅटमध्ये एक कर्णधार या योजनेसाठी विश्वासार्ह ठरेल.