Dasun Shanaka Runout, ICC Rule: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २०२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी २०३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पथुम निसंकाने शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारतीय संघाची बरोबरी केली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. दरम्यान सुपर ओव्हरमध्ये दासून शनाका धावबाद झाला होता. पण तरीसुद्धा पंचांनी त्याला बाद घोषित केलं नाही. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि दासून शनाकाची जोडी मैदानावर आली. तर भारतीय संघाकडून अर्शदीप सिंग गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर असं काही घडलं जे पाहून कर्णधार सूर्यकुमार यादवला विश्वासच बसत नव्हता. तर झाले असे की, श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना दासून शनाका स्ट्राईकवर होता. त्यावेळी अर्शदीप सिंगन ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर शनाकाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. संजूने लगेच थ्रो करत त्याला रनआऊट केलं. ज्यावेळी चेंडू यष्टीला लागला त्यावेळी तो क्रिझच्या बाहेर होता. पण चेंडू टाकताच अर्शदीपने झेलबाद साठी पंचांकडे जोरदार अपील केली. पंचांनीही त्याला बाद घोषित केलं. पण दासून शनाकाने डीआरएसची मागणी केली. ज्यात चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क न झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे तो धावबाद होण्यापासून बचावला.
डीआरएसमध्ये तो झेलबाद झाला नसल्याचं स्पष्ट झालं. यासह तो धावबाद होण्यापासूनही बचावला. शनाकाने डीआरएसची मागणी केल्यामुळे, पंचांनी पुढील निर्णय दिलाच नाही. यावरून कर्णधार सूर्यकुमार यादवने पंचांसोबत बराच वेळ चर्चा केली. शेवटी तो नाबाद राहिला. पण पुढच्याच चेंडूवर तो बाद होऊन माघारी परतला.
नियम काय सांगतो?
एमसीसीचा नियम २०.१.१.३ नुसार जर पंचांनी फलंदाजाला झेलबाद घोषित केलं असेल,तर चेंडू आपोआप डेड होतो. जर डीआरएस घेतला, तर केवळ चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता की नाही हे तपासून पाहिलं जातं. अल्ट्राएजमध्ये पाहिलं असता, स्पष्टपणे दिसून आलं की शनाकाच्या बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नव्हता. त्यामुळे पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. त्यामुळे तो धावबाद होण्यापासून बचावला. शनाका क्रिझच्या बाहेर असूनही त्याला नाबाद घोषित करण्यात आलं.