Amol Muzumdar PM Narendra Modi Visit: भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपदाचा मान पटकावला आहे. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी बुधवारी (५ नोव्हेंबर) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान मोदींनी खेळाडूंसोबत फोटोशूट केलं. यासह चर्चा देखील केली. दरम्यान भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी मोदींना इंग्लंडमधील एक किस्सा सांगितला.
मोदींसोबत चर्चा करताना अमोल मुझुमदार म्हणाले, “आम्ही जून महिन्यात इंग्लंडच्या किंग्ज चार्ल्स यांची भेट घेतली. प्रोटोकॉलनुसार फक्त २० लोकांना त्यांची भेट घेण्याची अनुमती दिली गेली होती. त्यामुळे सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना त्यांची भेट घेण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे मी सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची माफी मागितली होती. त्यावेळी ते मला म्हणाले होते की, हरकत नाही. आम्हाला हा फोटो नको. आम्हाला ४ किंवा ५ नोव्हेंबरला नरेंद्र मोदींसोबत फोटो हवा आहे. आज तोच दिवस आहे.”
भारतीय खेळाडूंनी मानले मोदींचे आभार
भारतीय संघाने याआधी २०१७ मध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण फायनलमध्ये इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना भारताने अवघ्या ९ धावांनी गमावला होता. या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंचा उत्साह वाढवला होता. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरने मोदींचे आभार मानले.
भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ५० षटकांच्या समाप्तीनंतर ७ गडी बाद २९८ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून शफाली वर्माने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली होती. तर दीप्ती शर्माने ५८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून लॉराने दमदार शतकी खेळी केली. पण दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव ६ गडी बाद २४६ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ५२ धावांनी आपल्या नावावर केला.
