Yuvraj Singh on MS Dhoni: भारताचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंगने महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा खुलासा केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान युवीला त्याच्या आणि माहीच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर युवराजने असे काही उत्तर दिले आहे ज्याने संपूर्ण चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. युवीने २०११च्या विश्वचषकातील फायनलमध्ये युवराजआधी धोनीने फलंदाजीसाठी जाण्यामागचे कारणही उघड केले आहे. त्याच्या आणि धोनीच्या क्रिकेटमधील नात्याचे उदाहरण देताना युवराजने २०११च्या वर्ल्ड कप फायनलबद्दल काही आठवणी सांगितल्या आहेत.
२०११च्या विश्वचषक फायनलमध्ये काय झाले?
युवराज म्हणाला, “वर्ल्ड कप फायनलमध्ये (२०११) असे ठरले होते की जर गौती (गौतम गंभीर) आउट झाला तर मी जाईन, जर विराट आउट झाला तर धोनी बॅटिंगला जाईल. मैत्रीपेक्षा ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही आमच्या प्रोफेशनबद्दल खूप गंभीर होतो. मी त्याला यासाठी शुभेच्छा देतो आणि मला माहित आहे की तोही मला खूप शुभेच्छा देतो. धोनी आता निवृत्त झाला असून मी पण निवृत्त झालो आहे. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा फक्त मित्रांसारखे गप्पा मारतो. मी नेहमी त्याला म्हणतो की, ‘मला तुला जाणून घ्यायचे नाही’. आम्ही एकत्र एक कमर्शियल शूट केले आहे. त्यामुळे आमच्या भूतकाळाबद्दल बोलण्यात मजा आली.”
माजी अष्टपैलू खेळाडू युवराज म्हणाला, “माही आणि मी खूप जवळचे मित्र नाही. क्रिकेटमुळे आम्ही मित्र झालो होतो, कारण आम्ही एकत्र खेळलो. माहीची जीवनशैली माझ्यापेक्षा खूप वेगळी होती, त्यामुळे आम्ही कधीच जवळचे मित्र नव्हतो आणि नाही. जेव्हा मी आणि माही मैदानात होतो तेव्हा इंडियाला विश्वचषक जिंकण्यासाठी १०० टक्क्यांहून अधिक दिले. त्यात तो कर्णधार, मी उपकर्णधार होतो. जेव्हा तो संघात सामील झाला तेव्हा त्याच्यापेक्षा चार वर्षांनी वरिष्ठ होतो. जेव्हा तुम्ही कर्णधार आणि उपकर्णधार असता तेव्हा निर्णयांमध्ये मतभेद होतात.”
माजी डावखुरा खेळाडू युवी पुढे म्हणाला, “कधी मला न आवडणारे निर्णय त्याने घेतले, तर कधी न आवडणारे निर्णय मी घेतले. हे प्रत्येक संघात घडते. मी माझ्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असताना, मला माझ्या करिअरच्या संदर्भात योग्य सूचना मिळत नसताना मी त्याला सल्ला विचारला. त्यानेच मला सांगितले की निवड समिती सध्या तुझ्याकडे पाहत नाही. मला धोनीमुळे निदान सत्य तरी कळालं. हे २०१९च्या विश्वचषकापूर्वीची घटना होती.”
युवराज पुढे म्हणाला की, “संघातील सहकारी मैदानाबाहेर तुमचे चांगले मित्र असण्याची गरज नाही. प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते. काही लोक ठराविक लोकांबरोबर हँग आउट करतात, मैदानावर जाण्यासाठी तुम्ही सर्वांशी चांगले मित्र असणे आवश्यक नाही. तुम्ही कोणताही संघ घेतल्यास, सर्व ११ खेळाडू एकत्र येत नाहीत. काही मित्र असतात तर काही नसतात. आम्ही मैदानात उतरल्यावर आमचा अहंकार सोडून देश आणि आमच्या संघासाठी योगदान दिले आहे.”