IND W vs SA W Final Tickets Delay On Book My Show App: भारतीय महिला संघाने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना २ नोव्हेंबरला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी आणि स्टेडियममध्ये जाऊन आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सामन्याला एक दिवस शिल्लक असूनही ऑनलाईन तिकीट विक्रीलाa सुरुवात झालेली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्याचे तिकीट बुक माय शो ॲपवर उपलब्ध आहेत. पण तिकीट बुक करण्यासाठी ॲप उघडल्यावर कमिंग सून असं लिहिलेलं दिसून येत आहे. तिकीट विक्रीसाठी लाईव्ह केव्हा येणार यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण कमिंग सून लिहिलेलं पाहून क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून नाराजी व्यक्त केली आहे.
तिकीट विक्रीला सुरुवात केव्हा होणार? हे जाणून घेण्यासाठी एका युजरने बुक माय शो ॲपच्या सोशल मीडिया अकाउंटला टॅग करून विचारलं की, तिकीट विक्रीला सुरुवात केव्हा होणार? या पोस्टवर बुक माय शोने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “नमस्कार, आम्हाला तुमचा आनंद आवडला. आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत तुम्हाला पाहून तितकाच आनंद झाला आहे. कृपया आमच्या सोशल मीडिया, अॅप आणि/किंवा वेबसाइटशी संपर्कात रहा, कारण बुकिंग लाईव्ह होताच त्याबद्दलची माहिती रिअल-टाइममध्ये दिसून येईल.”

तिकीट विक्रीला सुरुवात करण्यास उशीर का होत आहे, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र काही जाणकारांच्या मते, तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तिकीट आहे त्याच किमतीत क्रिकेट चाहत्यांना मिळवीत यासाठी तिकीट विक्रीला उशीरा सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
