India vs England: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना एजबस्टनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
जसप्रीत बुमराह बाहेर
या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहला या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्या जागी आकाश दीपला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. तर शार्दुल ठाकूरला बाहेर करून नितीश कुमार रेड्डीला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. यासह साई सुदर्शनला बाहेर ठेवून वॉशिंग्टन सुंदरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.
जसप्रीत बुमराहला बाहेर ठेवण्याचं कारण काय?
नाणेफेक गमावल्यानंतर शुबमन गिल म्हणाला, “आम्हालाही नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायची होती. या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये ३ बदल करण्यात आले आहेत. रेड्डी, वॉशिंग्टन आणि आकाश दीपला प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचा कामाचा ताण सांभाळण्यासाठी (वर्कलोड ) त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या मैदानावर गोलंदाजांना चांगली मदत मिळते. या सामन्यात बुमराह खेळताना दिसेल. ” हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असल्याचं गिलने सांगितलं.
या महत्वाच्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळताना दिसून येणार नाही. त्याच्या जागी आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी अनुभवी मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असणार आहे. आता भारतीय संघ कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११
भारतीय संघाची प्लेइंग ११: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
या सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग ११:
बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर