India vs England 4th Test: मँचेस्टरच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. भारतीय संघ या मालिकेत २- १ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाला जर ही मालिका जिंकायची असेल तर हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. पण या सामन्यातील तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारतीय गोलंदाज विकेट्स घेण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून आले. पण, विकेट काही मिळत नव्हती. त्यावेळी सर्वांना कुलदीप यादवची आठवण आली. कुलदीपला प्लेइंग ११ मध्ये स्थान का दिलं जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने कुलदीपला संधी का दिली जात नाही, याबाबत मोठा खुलासा केला आहे.
इंग्लंडच्या फलंदाजांनी या सामन्यात फलंदाजी करताना तिसऱ्या दिवशी ५४४ धावांचा डोंगर उभारला आहे. तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मॉर्ने मॉर्केल म्हणाला, “ आम्ही जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा हाच विचार करतो की, आम्ही फलंदाजी लाईनअप कशी मजबूत करता येईल. कुलदीप हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. आम्ही त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यासाठी मार्ग शोधत आहोत. पण दुर्दैवाने फलंदाजीत समतोल साधणं कठीण होत आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “ खरं सांगू तर, खेळपट्टी अजून कोरडी आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरकडे विकेट्स घेण्याची संधी आहे. त्यामुळे आम्ही कुलदीपला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी टॉप ६ फलंदाजांनी सातत्याने धावा करणं खूप गरजेचं आहे.”
चौथ्या सामन्याआधी भारतीय संघातील २ प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहे. आकाशदीप दुखापतग्रस्त असल्यामुळे चौथ्या कसोटीतून बाहेर आहे. तर नितीश कुमार रेड्डी दुखापतग्रस्त असल्यामुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. अर्शदीप सिंग आकाशदीपची जागा घेणार होता. पण तो देखील दुखापतग्रस्त झाला आहे. तर नितीश कुमार रेड्डीच्या जागी शार्दुल ठाकूरच्या जागी संधी देण्यात आली आहे. या सामन्यात कुलदीप यादवला संधी दिली जाणार असं म्हटलं जात होतं. पण असं झालं नाही.