Mohammed Shami Comeback: काही दिवसांपूर्वी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ही मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त केली. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं होतं. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. तो पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला संघात स्थान दिलं गेलं नसल्याचं म्हटलं गेलं होतं. आता त्याला संघात स्थान का दिलं गेलेलं नाही, याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी संघाची निवड करण्यापूर्वी निवडकर्त्यांनी शमीला विचारलं होतं, पण त्याने आपल्या फिटनेसवर पूर्णपणे आत्मविश्वास दाखवला नव्हता, त्यामुळे त्याला संघात स्थान दिलं गेलं नसल्याचं म्हटलं जात आहे.

टेलिग्राफच्या एका रिपोर्टमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले की, “शमीला फॉर्ममुळे संघाबाहेर केलं गेलं नव्हतं. पूर्णपणे फिट नसल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीही तो पूर्णपणे फिट नसल्याने त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. इंग्लंड दौऱ्यावर तो पुनरागमन करेल, अशी चिन्ह होती. पण या दौऱ्याआधीही त्याला आपल्या फिटनेसवर आत्मविश्वास नव्हता. संघाची घोषणा करण्याआधी निवडकर्त्यांनी त्याला संपर्क केला होता.”

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघात स्थान न मिळालेला मोहम्मद शमी आता पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या काही दिवसात दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी मोहम्मद शमीला ईस्ट झोन संघात स्थान देण्यात आलं आहे. या स्पर्धेला येत्या २८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. शमीला जर भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवायचं असेल, तर या स्पर्धेत चांगली गोलंदाजी करणं अतिशय महत्वाचं असणार आहे.

बीसीसीआयच्या सुत्राने सांगितले की, “तो संपूर्ण स्पर्धा खेळू शकणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला गुडघेदुखी आणि हॅमस्ट्रींगचा त्रास होत आहे. तो रणजी ट्रॉफीतही खेळत असताना ३ ते ४ षटकं टाकायचा आणि मैदानाबाहेर निघून जायचा. त्यामुळे त्याचं शरीर साथ देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.”

मोहम्मद शमी हा आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघासाठी हिरो ठरला होता. या स्पर्धेत त्याने दमदार गोलंदाजी केली होती. यासह तो या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी होता. पण या स्पर्धेनंतर त्याला दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर पडावं लागलं होतं. काही महिने तो संघाबाहेर राहिला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी इंग्लंडविरूद्ध झालेल्या टी-२० मालिकेत त्याला पुनरागमनाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. त्याने या स्पर्धेत विकेट्स घेतल्या होत्या. पण त्याने धावाही खूप खर्च केल्या होत्या. आता वेस्टइंडिजविरूद्ध होणाऱ्या मालिकेत त्याला संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.