Prithvi Shaw vs Musheer Khan fight Reason : रणजी चषक २०२५-२६ सुरू होण्याआधी मुंबई व महाराष्ट्राच्या संघात पुण्यामध्ये मंगळवारपासून (७ ऑक्टोबर) सराव सामना खेळवला जात आहे. या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानात मोठा राडा पाहायला मिळाला. महाराष्ट्राकडून खेळणारा पृथ्वी शॉ रागाच्या भरात त्याच्या जुन्या सहकाऱ्यावर (मुशीर खान) अंगावर धावून गेला. या गोंधळाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. अखेर पंचांनी व मुंबईच्या खेळाडूंनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. आता या वादाचं नेमकं कारण समोर आलं आहे.
मुंबई विरुद्ध महाराष्ट्र यांच्यातील सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वी शॉने २१९ चेंडूत १८१ धावांची खेळी केली. त्याने १४० चेंडूत शतक झळकावलं. त्यानंतर त्याने धावगती वाढवली. १८१ धावांवर खेळत असताना त्याने एक मोठा फटका लगावला. मात्र, सीमारेषेजवळ उभ्या मुशीर खान याने त्याचा झेल टिपला आणि पृथ्वी शॉची वादळी खेळी संपुष्टात आणली. त्यानंतर पृथ्वी शॉ मैदानावरून परत जात असताना मुशीर खान व त्याचे सहकारी जल्लोष करत होते. त्याचवेळी पृथ्वी शॉ व मुशीर खानमध्ये राडा झाला.
पृथ्वी शॉ व मुशीर खानमधील वादाचं कारण काय?
पृथ्वी शॉ व मुशीर खानमधील वादाचं नेमकं कारण आता समोर आलं आहे. त्यानुसार पृथ्वी शॉ फलंदाजी करत असताना मुशीर खान स्लेजिंग करून त्याचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पृथ्वीने त्याला जुमानलं नाही. पृथ्वी शॉची फलंदाजी सुरू असताना हा प्रकार चालू होता. अखेर मुशीर खाननेच त्याचा झेल टिपला. त्यानंतर पृथ्वी शॉ पव्हेलियनकडे परतत असताना मुशीर खान त्याला ‘थँक यू’ (धन्यवाद) म्हणाला. त्यानंतर पृथ्वी शॉ चांगलाच संतापला आणि त्याच्या मागे धावून गेला. क्रिकबजने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दोन्ही संघांमधील सुत्रांच्या हवाल्याने क्रिकबझने म्हटलं आहे की ७४ व्या षटकात महाराष्ट्र ३ बाद ४३० धावांपर्यंत पोहोचलेला अताना ही घटना घडली. इरफान उमैरच्या गोलंदाजीवर फाइन लेगला सीमारेषेजवळ उभ्या मुशीर खानने पृथ्वी शॉचा झेल टिपला. बाद झाल्यानंतर त्याची विकेट सेलिब्रेट करत असतानाच मुशीर खान पृथ्वी शॉला ‘थँक यू’ म्हणाला, त्यामुळे दोघांमध्ये भांडण झालं.
महाराष्ट्राच्या कर्णधाराकडून पृथ्वी शॉचा बचाव
महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावने या घटनेबद्दल म्हणाला, “हा सराव सामना आहे. दोन्ही संघांमधील खेळाडू एकमेकांचे जुने सहकारी आहेत. अशा गोष्टी होत असतात. आता सगळं काही ठीक आहे. हे वृत्त प्रसिद्ध करेपर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या घटनेप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. तसेच यावर कुठल्ही कारवाई केली नव्हती.