Rishabh Pant Injury Update: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. तिसऱ्या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झालेला उपकर्णधार ऋषभ पंत चौथ्या सामन्यात खेळणार का? याबाबत रायन डे डोशेटने मोठी अपडेट दिली आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यष्टीरक्षण करत असताना ऋषभ पंतच्या तर्जनीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं होतं. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात आला. पण दुखापतग्रस्त असतानाही रिषभला नाईलाजाने फलंदाजीला यावं लागलं. सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने ७४ आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ९ धावा केल्या होत्या.

काय म्हणाला रायन डे डोशेट?

मँचेस्टर कसोटीआधी सहाय्यक प्रशिक्षक रायन डे डोशेटने ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. ऋषभ पंतने सरावादरम्यान फलंदाजी केली, पण टीम मॅनेजमेंट त्याच्या बोटाच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती रायन डे डोशेटने दिली आहे. ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत अपडेट देताना रायन डे डोशेट म्हणाला, “ऋषभने लॉर्ड्स कसोटीतील दोन्ही डावात फलंदाजी केली. त्याच्या बोटाच्या दुखापतीत आता सुधारणा झाली आहे. आम्ही आशा करतो की, तो मँचेस्टर कसोटीसाठी उपलब्ध असेल. तो फलंदाज म्हणून खेळणार, हे जवळजवळ निश्चित आहे. पण, यष्टीरक्षक म्हणून खेळणार की नाही, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.”

ऋषभ पंतचं खेळणं हे भारतीय संघासाठी खूप महत्वाचं आहे. कारण आतापर्यंत झालेल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्याने फलंदाजीत मोलाचं योगदान दिलं आहे. लॉर्ड्स कसोटीत तो दुखापतग्रस्त होता. असं असतानाही तो फलंदाजीला आला आणि त्याने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या डावात तो स्वस्तात माघारी परतला. जर तो दुसऱ्या डावात तो टिकून राहिला असता, तर निकाल भारतीय संघाच्या दिशेने लागू शकला असता. आता ऋषभ पंत मँचेस्टर कसोटीत खेळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.