प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी अंतिम लढतीचा अनुभव आवश्यक असतो, याचाच प्रत्यय घडवित चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्विटोवाने महिलांचे विजेतेपद मिळविले. तिने कॅनडाच्या युजेनी बुचार्ड हिचा ६-३, ६-० असा धुव्वा उडवित या स्पर्धेच्या दुसऱ्या जेतेपदाला गवसणी घातली.
१३ व्या मानांकित बुचार्डने प्रथमच विम्बल्डन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. क्विटोवाने २०११ मध्ये येथे विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे अंतिम फेरीत क्विटोवाचे वर्चस्व राहील अशी अपेक्षा होती. तिने केलेल्या वेगवान व चतुरस्र खेळापुढे अवघ्या ५४ मिनिटांमध्ये बुचार्डला पराभव पत्करावा लागला. क्विटोवाचे हे कारकिर्दीतील  १२ वे जेतेपद आहे.
क्विटोवाने सामन्याच्या सुरुवातीपासून आपल्या खेळावर नियंत्रण राखले होते. तिने केलेल्या फोरहँड परतीच्या फटक्यांपुढे बुचार्डचा बचाव सपशेल निष्प्रभ ठरला. कारकिर्दीत प्रथमच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत खेळत असल्याचे दडपण बुचार्डच्या खेळात सतत दिसून येत होते. पहिल्या सेटमध्ये तीन वेळा तिने सव्‍‌र्हिस राखली. तिने परतीचे काही सुरेख फटके मारले. हा सेट क्विटोवाने ३२ मिनिटांत जिंकला.
पहिला सेट गमावल्यानंतर बुचार्ड निराश झाली. तर पहिला सेट सहज जिंकल्यामुळे क्विटोवाच्या खेळात आणखी जोश आला. तिने मैदानाच्या दोन्ही कॉर्नरजवळ सुरेख फटके मारले. या सेटमध्ये बुचार्डला एकही सव्‍‌र्हिस राखता आली नाही. हा सेट अवघ्या २२ मिनिटांत घेत क्विटोवाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
माझ्या प्रशिक्षकांनी अंतिम लढतीसाठी योजना आखल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी चांगली खेळू शकले. विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद मी याआधीही पटकावले होते. मात्र त्यानंतर माझ्या कामगिरीत घसरण झाली होती. त्यामुळे पुनरागमनसह जेतेपद पटकावण्याचा आनंद अवर्णनीय आहे. बुचार्ड प्रतिभाशाली खेळाडू आहे, मी सर्वोत्तम खेळ केल्यानेच विजय मिळवू शकले.