विम्बल्डन : तब्बल २१९४ दिवस, ३४ सामने आणि ३० प्रतिस्पर्धी..नोव्हाक जोकोव्हिचचे विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हे वर्चस्व अखेर स्पेनचा २० वर्षीय टेनिसपटू कार्लोस अल्कराझने संपुष्टात आणले. टेनिसचे भविष्य मानले जाणाऱ्या अल्कराझने २०१७ नंतर ऑल इंग्लंड क्लबच्या स्पर्धेत जोकोव्हिचला नमवणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आणि कारकीर्दीत पहिल्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. तसेच सेंटर कोर्टवर जोकोव्हिच ४५ सामन्यांनंतर पराभूत झाला.

रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत अल्कराझने २३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचवर १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असा विजय साकारताना कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. गेल्या वर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अल्कराझला विम्बल्डनमध्येही अग्रमानांकन लाभले होते. मात्र, त्यानंतरही त्याने जोकोव्हिचला नमवणे हा धक्कादायक निकाल मानला जात आहे.

जोकोव्हिच गेल्या चार विम्बल्डन स्पर्धात विजेता ठरला होता. तसेच त्याने या वर्षी ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यामुळे अंतिम लढतीत त्याचेच पारडे जड मानले जात होते. त्याला रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन जेतेपदांशी बरोबरी साधण्याची संधीही होती. मात्र, अल्कराझच्या उत्कृष्ट खेळामुळे जोकोव्हिचची ही संधी हुकली.

जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये अल्कराझची सव्‍‌र्हिस दोन वेळा तोडत ५-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्याला पहिला सेट ६-१ असा जिंकण्यात यश आले. त्यानंतर मात्र अल्कराझने पुनरागमन केले. संघर्षपूर्ण झालेल्या दुसऱ्या सेटमध्ये अल्कराझने टायब्रेकरमध्ये बाजी मारली. हा सेट साधारण दीड तास चालला. दीर्घकाळ चाललेल्या या सेटनंतर जोकोव्हिच दमलेला दिसला. तसेच तो काही वेळा कोर्टवर घसरला. त्याने तिसरा सेट १-६ असा गमावला. मात्र, चौथ्या सेटमध्ये त्याने पुन्हा विजय मिळवत सामना बरोबरीत आणला. जोकोव्हिच पाच सेटपर्यंत जाणारे सामने जिंकण्यासाठी ओळखला जातो. मात्र, अल्कराझने सुरुवातीलाच जोकोव्हिचची सव्‍‌र्हिस तोडली. त्यानंतर आपली सव्‍‌र्हिस राखत हा सेट दोन गेमच्या फरकाने जिंकत दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्कराझविरुद्ध खेळणे आव्हानात्मक!

‘‘तू अप्रतिम सव्‍‌र्हिस केली आणि मोक्याच्या क्षणी गुण मिळवले. त्यामुळे तू हा सामना जिंकणे हा योग्यच निकाल आहे. तुझे अभिनंदन. मला लाल मातीच्या आणि हार्ड कोर्टवर तुझ्याविरुद्ध खेळताना आव्हान जाणवत होतेच. आता ग्रास कोर्टवरही तू चांगला खेळ करत आहेस,’’ अशा शब्दांत अंतिम लढतीनंतर जोकोव्हिचने अल्कराझची स्तुती केली.