वृत्तसंस्था, लंडन : सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेतील सत्ता अबाधित राखताना रविवारी सलग चौथ्या जेतेपदावर कब्जा केला. ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसवर चार सेटमध्ये मात करत जोकोव्हिचने कारकीर्दीतील २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले. तसेच विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याची ही तब्बल सातवी वेळ ठरली.

ऐतिहासिक सेंटर कोर्टवर झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात विश्वातील अव्वल टेनिसपटू जोकोव्हिचने किरियॉसला ४-६, ६-३, ६-४, ७-३ (७-३) असे पराभूत केले. जोकोव्हिच सामन्याचा पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीपाठोपाठ अंतिम सामन्यातही जोकोव्हिचने पहिला सेट गमावला. किरियॉसने एकदा जोकोव्हिचची सव्‍‌र्हिस तोडत पहिला सेट ६-४ अशा फरकाने जिंकल्यामुळे त्याच्या पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, जोकोव्हिचने खेळ उंचावत आक्रमणाची गती वाढवल्यानंतर किरियॉसने चुका करण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या सेटच्या चौथ्या गेममध्ये जोकोव्हिचने किरियॉसची सव्‍‌र्हिस तोडत ३-१ अशी भक्कम आघाडी मिळवली. मग पुढे आपली सव्‍‌र्हिस राखत ४-१ अशी आघाडी वाढवली. यानंतर दमदार सव्‍‌र्हिससाठी ओळखल्या जाणाऱ्या किरियॉसला पुनरागमन करणे शक्य झाले नाही आणि जोकोव्हिचने हा सेट ६-३ अशा फरकाने जिंकत सामन्यात बरोबरी साधली.

पाहा व्हिडीओ –

तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी संघर्षपूर्ण खेळ केल्यामुळे ४-४ अशी बरोबरी होती. मात्र, जोकोव्हिचने मोक्याच्या क्षणी आक्रमकता दाखवत पुन्हा किरियॉसची सव्‍‌र्हिस तोडली. मग आक्रमक वृत्तीच्या किरियॉसच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. जोकोव्हिचने दर्जेदार खेळ सुरू ठेवत तिसरा सेट ६-४ असा आपल्या नावे केला.

चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला. किरियॉसने हार न मानण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवले. परंतु दुसऱ्या बाजूने जोकोव्हिचनेही अनुभव पणाला लावला. त्यामुळे या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली. त्यानंतर बरोबरी कोंडी फोडण्यासाठी झालेल्या टायब्रेकरमध्ये जोकोव्हिचने ७-३ अशी सरशी साधत वर्षांतील पहिले जेतेपद पटकावले.

गेल्या वर्षी तीन ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या जोकोव्हिचला या वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत खेळता आले नव्हते. करोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास नकार दिल्याने त्याला ऑस्ट्रेलियातून परत पाठवण्यात आले होते. त्यामुळे तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. त्यानंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत त्याला राफेल नदालकडून पराभव पत्करावा लागला होता.

गेल्या हंगामाअंती पुरुषांमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम संयुक्तरीत्या जोकोव्हिच, नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या नावे होता. या तिघांनीही प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवली होती. मात्र, नदालने ऑस्ट्रेलिया आणि फ्रेंच या दोन्ही स्पर्धा जिंकत सर्वाधिक (२२) ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम आपल्या नावे केला होता. परंतु आता जोकोव्हिचने २१वी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकत नदालच्या विक्रमाच्या दिशेने कूच केली आहे.

७जोकोव्हिचने सातव्यांदा विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यामुळे खुल्या स्पर्धाच्या युगात सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने पीट सॅम्प्रससह दुसरे स्थान मिळवले आहे. केवळ रॉजर फेडररला (८) या दोघांपेक्षा अधिक वेळा ही स्पर्धा जिंकता आली आहे.

२८ जोकोव्हिचने विम्बल्डन स्पर्धेतील गेले सलग २८ सामने जिंकले आहेत. २०१७ नंतर एकाही खेळाडूला जोकोव्हिचवर मात करता आलेली नाही. ७-१जोकोव्हिच आतापर्यंत आठ वेळा विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात खेळला असून त्यापैकी सात सामने जिंकण्यात त्याला यश आले. त्याला केवळ २०१३मध्ये अँडी मरेकडून पराभव पत्करावा लागला होता.

एब्डेन-पर्सेलला पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद

ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन आणि मॅक्स पर्सेल या जोडीने धक्कादायक विजयाची नोंद करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटाचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात १४व्या मानांकित एब्डेन-पर्सेल जोडीने दुसऱ्या मानांकित क्रोएशियाच्या निकोला मेक्टिच आणि मेट पाव्हिच जोडीवर ७-६ (७-५), ६-७ (३-७), ४-६, ६-४, ७-६ (१०-२) अशी पाच सेटमध्ये मात केली. एब्डेन आणि पर्सेल या दोघांच्याही कारकीर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. तसेच विम्बल्डनमधील पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळवणारी ही २२ वर्षांतील पहिली ऑस्ट्रेलियन जोडी ठरली.

भारताची ऐश्वर्या पराभूत

भारताच्या ऐश्वर्या जाधवला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कुमारी (१४ वर्षांखालील) गटातील पाच पैकी चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला. कोल्हापूरच्या ऐश्वर्याला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यानंतर तिने दुसऱ्या फेरीतील सामना गमावला. मग रोमेनियाची आंद्रेया सोरे (६-३, ६-२), ब्रिटनशी मिका स्टोयसाव्हलेव्हिच (६-४, ६-१) आणि न्यूझीलंडची ऐशी दास (६-३, २-६, १०-५) यांच्याकडून ऐश्वर्याने सलग तीन साखळी सामन्यांत हार पत्करली. त्यामुळे तिला उपांत्य फेरी गाठता आली नाही.

विम्बल्डनच्या जेतेपदाचे महत्त्व सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्यासाठी ही सर्वात खास ग्रँडस्लॅम स्पर्धा होती आणि कायमच राहील. विम्बल्डन जिंकणे हे माझे लहापणापासूनचे स्वप्न होते आणि ते अनेकदा पूर्ण करण्यात यश आल्याचे समाधान आहे. ही स्पर्धा जिंकणे दरवेळी अधिकाधिक खास होते आहे. मी आज खूप आनंदीत आहे.

– नोव्हाक जोकोव्हिच

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे खेळाडू

खेळाडू              जेतेपदे

राफेल नदाल २२

नोव्हाक जोकोव्हिच   २१ 

रॉजर फेडरर २०

पीट सॅम्प्रस  १४