वृत्तसंस्था, लंडन : रशियाची माजी खेळाडू आणि आता कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एलिना रायबाकिनाने ऐतिहासिक अधिराज्य गाजवताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने पिछाडीवरून तिसऱ्या मानांकित टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरला पराभवाचा धक्का देत पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा केला. तसेच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी ती कझाकस्तानची पहिली टेनिसपटू ठरली.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विम्बल्डनमध्ये रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, २०१८पासून रशियन रायबाकिना कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करत असल्याने तिला यंदाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचे सोने केले. ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली अरब खेळाडू जाबेऊरने मात्र निराशाजनक खेळ केला.
ऐतिहासिक ‘सेंटर कोर्ट’ झालेल्या अंतिम सामन्यात १७व्या मानांकित रायबाकिनाने ३-६, ६-२, ६-२ अशा फरकाने बाजी मारली. जाबेऊरने अपेक्षेप्रमाणे या सामन्याची आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये १-१ अशी बरोबरी असताना जाबेऊरने रायबाकिनाची सव्र्हिस तोडत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. यानंतर दोन्ही खेळाडूंना आपली सव्र्हिस राखण्यात यश आले. मात्र, अखेर ५-३ अशी आघाडी असताना जाबेऊरने पुन्हा रायबाकिनाची सव्र्हिस भेदत पहिला सेट ६-३ असा आपल्या नावे केला.
दुसऱ्या सेटमध्ये रायबाकिनाने हार न मानण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवले. तिने पहिल्याच गेममध्ये जाबेऊरची सव्र्हिस तोडली. यानंतर तिने जाबेऊरला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. तिने हा सेट ६-२ अशा मोठय़ा फरकाने जिंकत सामन्यात बरोबरी साधली.
तिसऱ्या सेटमध्येही रायबाकिनाने दमदार खेळ सुरू ठेवताना पुन्हा पहिल्या गेममध्ये जाबेऊरची सव्र्हिस भेदली. मग आपली सव्र्हिस राखत २-० अशी आघाडी घेतली. यावेळी जाबेऊरला राग अनावर झाला. तिने आणखी चुका करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे रायबाकिनाने संयमाने खेळ करत आपले वर्चस्व कायम ठेवले. तिने सातव्या गेममध्ये पुन्हा जाबेऊरची सव्र्हिस तोडली आणि ५-२ अशी भक्कम घेतली. मग पुढील गेमही जिंकत या सेटमध्ये ६-२ अशी सरशी साधली आणि या स्पर्धेचे जेतेपदही मिळवले.
१ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी रायबाकिना ही कझाकस्तानची पहिली टेनिसपटू आहे.
६० गेल्या ६० वर्षांत प्रथमच एकाही ग्रँडस्लम स्पर्धेचा अंतिम सामना न खेळलेल्या दोन महिला खेळाडूंमध्ये जेतेपदाची लढत झाली.
११ विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी २३ वर्षीय रायबाकिना ही गेल्या ११ वर्षांतील सर्वात युवा महिला टेनिसपटू ठरली आहे. २०११मध्ये चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हाने वयाच्या २१व्या वर्षी विम्बल्डनचे जेतेपद मिळवले होते.
५ विम्बल्डन स्पर्धेला सलग पाचव्यांदा नवविजेती मिळाली आहे. यापूर्वीच्या चार पर्वात गार्बिने मुगुरुझा (२०१७), अँजेलिक कर्बर (२०१८), सिमोना हालेप (२०१९) आणि अॅश्ले बार्टी (२०२१) या टेनिसपटूंनी महिला एकेरीचे जेतेपद पटकावले होते. करोनाच्या कारणास्तव २०२० मध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली नव्हती.
विजयाबद्दल रायबाकिनाचे अभिनंदन. या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याचे मला दु:ख आहे. मात्र, अखेरीस एकच खेळाडू स्पर्धा जिंकू शकते. त्यामुळे मला निकाल स्वीकारावा लागेल. माझा मायदेशातील मुलींना प्रेरणा देण्याचा प्रयत्न आहे. त्या माझा खेळ पाहात असतील आणि मला ऐकत असतील, अशी आशा आहे.
– ओन्स जाबेऊर
विजेतेपदाच्या भावना मांडण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला यापूर्वी असे कधीही वाटले नव्हते. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे माझा खेळ अधिक बहरला, त्यामुळे त्यांचे आभार. विम्बल्डनच्या दुसऱ्या आठवडय़ातही (अखेरच्या काही फेऱ्या) माझे आव्हान शाबूत असेल असा मी विचारही केला नव्हता. मात्र, ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकल्याबद्दल मी खूप आनंदीत आहे.
– एलिना रायबाकिना
