Top Batsmans Of Team India In Absence Of Virat- Rohit: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्लेच्या मैदानावर रंगणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण, यावेळी इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघातील प्रमुख शिलेदार नसणार आहेत. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण इंग्लंड दौऱ्यावर ही अनुभवी जोडी संघात असणं खूप गरजेचं होतं. आता या दिग्गजांच्या अनुपस्थितीत कोणते असे फलंदाज आहेत, जे धावांचा पाऊस पाडू शकतात? जाणून घ्या.
केएल राहुल-
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल, वर्तमान भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. केएल राहुलकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे.केएल राहुलच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याने इंग्लंडविरूद्ध खेळताना १३ कसोटी सामन्यांमध्ये ९५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ दमदार शतकं देखील झळकावली आहेत. २०१८ मध्ये ओव्हल कसोटीत भारताचा निम्मा संघ अवघ्या १२१ धावांवर तंबूत परतला होता. त्यावेळी केएल राहुलने टिचून फंलदाजी करत १४९ धावांची खेळी केली होती.
त्यानंतर पुढील ९ डावात त्याला अवघ्या १५२ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर २०२१ मध्येही त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर शतकी खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा बहुमूल्य खेळी केली आहे. मात्र, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीतील सातत्या टिकवून ठेवता आलेलं नाही. या दौऱ्यावर त्याला फलंदाजीत सातत्य ठेवावं लागणार आहे.
यशस्वी जैस्वाल:
भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड दमदार राहिला आहे. मायदेशात फलंदाजी करताना त्याने १० कसोटी सामन्यांमध्ये ६०.६१ च्या दमदार सरासरीने धावा केल्या आहेत. तर परदेशात त्याची सरासरी ४४.१८ ची आहे. भारतात फलंदाजी करताना त्याचा दमदार रेकॉर्ड राहिला आहे. मात्र, परदेशात टिकून फलंदाजी करणं आणि संघाला चांगली सुरूवात करून देणं हे यशस्वी जैस्वाल समोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. यशस्वीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फलंदाजी करताना १६१ धावांची खेळी केली होती. अशीच कामगिरी तो इंग्लंड दौऱ्यावरही करेल, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.
शुबमन गिल:
शुबमन गिलकडे भारतीय कसोटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त दबाव असणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची मायदेशातील सरासरी ४२.०३ इतकी आहे. मात्र, परदेशात फलंदाजी करताना त्याच्या फलंदाजी सरासरीत चांगलीच घसरण झाली आहे. त्याची सरासरी २९.५० इतकीच आहे. गिलचा इंग्लंडमधील रेकॉर्ड टेन्शन वाढवणारा आहे. ३ सामन्यात त्याला अवघ्या ८८ धावा करता आल्या आहेत. यावेळी त्याला नेतृत्वाच्या दबावातून सावरून फलंदाजीत मोलाचं योगदान द्यावं लागणार आहे. कारण विराट- रोहितची जागा भरून काढायची असेल, तर या ३ फलंदाजांपैकी एकाला मैदानावर टिकून फलंदाजी करावी लागेल.