सिल्हेट : उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करणाऱ्या भारतीय महिला संघाचा सोमवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडशी सामना होणार आहे. या सामन्यातही भारतीय संघाचा युवा खेळाडूंना संधी देण्यावर भर असेल.

भारताने या स्पर्धेतील आपल्या सर्व सामन्यांत अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल केले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेकडे पाहता ऐरवी सातत्याने सामने खेळण्यास न मिळणाऱ्या खेळाडूंना अधिक संधी देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. फलंदाजी फळीत सलग बदल केले जात आहे, ज्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सातव्या स्थानावर पाठवण्यात आले. पण संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि अन्य फलंदाजांवर दडपण आले. त्यामुळे भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले.

 भारताच्या शफाली वर्माची लय संघाच्या दृष्टीने सकारात्मक बाब म्हणता येईल. कर्णधार हरमनप्रीतला गेल्या सामन्यात दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली होती. जेमिमा रॉड्रिग्जने या स्पर्धेत चुणूक दाखवली असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ती अग्रस्थानी आहे. दीप्ती शर्माने संघासाठी अष्टपैलू कामगिरी केली.

दुसरीकडे, थायलंडने दिमाखदार कामगिरी केली असून त्यांनी गेल्या तीन सामन्यांत विजय नोंदवले. थायलंड सहा गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. यजमान बांगलादेश चार गुणांसह त्यांच्या मागे असून त्यांचा अजून एक सामना शिल्लक आहे. भारतीय संघ आठ गुणांसह अग्रस्थानी आहे. पाकिस्तानवर धक्कादायक विजय मिळवणाऱ्या थायलंडविरुद्ध भारतीय संघाला आता सावधपणे खेळावे लागले.

’ वेळ : दुपारी १ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २