ICC Women’s World Cup 2025 Team of The Tournament: आयसीसीने महिला विश्वचषक २०२५ च्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. भारताला पहिला विश्वचषक विजय मिळवून देणारी हरमनप्रीत कौर हिचा सर्वोत्तम खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला नाही. या संघात विश्वविजेत्या भारत आणि उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश आहे.

भारताकडून सलामीवीर स्मृती मानधना, फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंट दीप्ती शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे, तर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्व्हार्डचाही समावेश आहे. ७१.३७ च्या सरासरीने ५७१ धावा करून विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.

११ खेळाडूंच्या या संघात उपांत्य फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील तीन खेळाडूंचाही समावेश आहे. या तीन खेळाडू म्हणजे अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅश गार्डनर आणि अलाना किंग आहेत. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टनला संघात स्थान देण्यात आलं आहे, तर पाकिस्तानची सिद्रा नवाज ही बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या संघातून निवडलेली एकमेव खेळाडू आहे.

स्मृती मानधना स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने ५४.२५ च्या सरासरीने ४३४ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. टीम ऑफ द टूर्नामेंटची कर्णधार म्हणून लॉरा वुल्व्हार्डची निवड करण्यात आली आहे. लॉराने संपूर्ण स्पर्धेत प्रभावी फलंदाजी केली. तिने दोन्ही बाद फेरीच्या सामन्यांमध्ये शतकं झळकावली. ज्यामध्ये उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १६९ धावा आणि अंतिम फेरीत भारताविरुद्ध १०१ धावांची खेळी केली होती.

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ टीम ऑफ द टूर्नामेंट

स्मृती मानधाना (भारत), लॉरा वुल्व्हार्ड (दक्षिण आफ्रिका) (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज (भारत), मारिझान कॅप (दक्षिण आफ्रिका), अ‍ॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), दीप्ती शर्मा (भारत), अ‍ॅनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया), नदीन डी क्लार्क (दक्षिण आफ्रिका), सिद्रा नवाज (पाकिस्तान) (विकेटकीपर), अलाना किंग (ऑस्ट्रेलिया).