एपी, सिडनी

Women World Cup Football Tournament :लॉरेन जेम्सच्या निर्णायक गोलच्या जोरावर युरोपीय विजेत्या इंग्लंड संघाने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात शुक्रवारी डेन्मार्कवर १-० असा निसटता विजय मिळवला. तसेच चीनने हैतीवर १-० अशा फरकानेच मात केली.बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेली डेन्मार्कची एमेली वांग्सगार्ड गोल करण्याच्या जवळ पोहोचली होती, पण इंग्लंडने तिला रोखत विजय नोंदवला.एमेलीनेच ‘ड’ गटाच्या सुरुवातीच्या सामन्यात चीनविरुद्ध ९०व्या मिनिटाला गोल करत डेन्मार्कच्या विजयात निर्णायक भूमिका पार पाडली होती. मात्र, इंग्लंडविरुद्ध डेन्मार्कला विजय मिळवून देण्यात ती अपयशी ठरली.

या सामन्यातील गोलसह इंग्लंडच्या संघाने महिला विश्वचषकात सलग १५ सामन्यांत गोल करण्याच्या नॉर्वेच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. तसेच या विजयामुळे इंग्लंडच्या संघाने पुढील फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. गटातील अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर चीनचे आव्हान असेल, तर डेन्मार्कचा सामना हैतीशी होईल.

याच गटातील अन्य सामन्यात, वांग शुआंगने (७४व्या मिनिटाला) पेनल्टीवर केलेल्या गोलमुळे चीनने हैतीवर १-० असा विजय नोंदवला. झँग रुइला सामन्याच्या २९व्या मिनिटाला ‘लाल कार्ड’ दाखवण्यात आले. त्यानंतर उर्वरित सामन्यात चीनला १० खेळाडूंसह खेळावे लागले. मात्र, यानंतरही त्यांच्या बचावफळीला भेदण्यात हैतीला यश मिळाले नाही. दहा खेळाडूंसह खेळताना विजय मिळवणारा चीन हा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील केवळ दुसरा संघ आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला गुण

पाच मिनिटांच्या आत केलेल्या दोन गोलमुळे अर्जेटिनाने दक्षिण आफ्रिकेला २-२ असे बरोबरीत रोखले. या बरोबरीनंतर दोन्ही संघांना एकेक गुण मिळाला आहे. महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला प्रथमच गुण मिळवण्यात यश आले. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीत त्यांना एकही सामना जिंकता आला नव्हता. दुसरीकडे अर्जेटिनाला महिला विश्वचषक स्पर्धेतील गेल्या ११ सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून लिंडा एम (३०व्या मि.) आणि थेम्बी गातलाना (६६व्या मि.) यांनी, तर अर्जेटिनाकडून सोफिया ब्राउन (७४व्या मिनिटाला) व रोमिना नुनेज (७९व्या मि.) यांनी गोल झळकावले.