देशभरात आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मग या सोहळ्यात आपले खेळाडू कसे मागे राहतील?? भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी आपली आई, पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांना एक विशेष गिफ्ट दिलं आहे. महिला दिनानिमीत्ताने सचिनने आपल्या आईसाठी खास वांग्याचं भरीत बनवलं आहे. या रेसिपीचा व्हिडीओ सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

आईसाठी वांग्याचं भरीत बनवत असताना सचिन एका कसलेल्या शेफ प्रमाणे किचनमध्ये वावरत होता. वांग्याचं भरीत बनवल्यानंतर सचिनने एका वाटीतून आईला चवीसाठी दिलं. आपल्या मुलाने केलेलं भरीत खाल्ल्यानंतर रजनी तेंडुलकर यांनीही त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी आपण लहान असताना आई आपल्यासाठी अशाच प्रकारे भरीत बनवायची ही आठवण सचिनने सांगितली.

अवश्य वाचा – Video : मराठमोळ्या केदार जाधवने राखला ‘आर्मी कॅप’चा मान ! धोनीला केला कडक सॅल्युट

महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते. तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांनी मिळवलेल्या यशाचा, अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते. महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने काही मार्गदर्शक तत्त्वे, कार्यक्रम निश्चित केले आहेत.

अवश्य वाचा – आता थांबलो तर तिला आवडणार नाही, आईच्या निधनाचं दु:ख विसरुन मुंबईचा तुषार देशपांडे मैदानात