नवी दिल्ली : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नियोजित सामन्यांबाबतच्या अनिश्चिततेवर अखेर पडदा पडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल करताना चिन्नास्वामी येथील सामने आता नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविण्याचा निर्णय घेतला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाच्या पहिल्या ‘आयपीएल’ जेतेपदाच्या जल्लोषावेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर खेळाडूंच्या स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांच्या चेंगराचेंगरीत ११ जण ठार झाले होते. ४ जूनला झालेल्या या घटनेनंतर स्टेडियम आणि परिसरातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. या स्टेडियममध्ये महिला विश्वचषक स्पर्धेचे सामने घेण्यासाठी बंगळूरु पोलिसांकडूनही मंजुरी मिळू शकली नाही. त्यातच कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या महाराज चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील सामनेही चिन्नास्वामीवर घेण्यास परवानगी मिळाली नाही. या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, ‘आयसीसी’ने ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला विश्वचषकातील सामने बंगळूरुबाहेर हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

आता डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये एकूण पाच सामने होणार असून यात उपांत्य फेरीची लढत आणि पाकिस्तान पात्र न ठरल्यास अंतिम लढतीचा समावेश आहे. ‘‘अनपेक्षित परिस्थितीमुळे, महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करणे भाग पडले आहे. मात्र, या स्पर्धेचे सामने पाच जागतिक दर्जाच्या स्टेडियममध्ये होणार असल्याचे सांगताना आम्हाला आनंद होत आहे,’’ असे ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शहा यांनी सांगितले.

४ जूनला झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या चौकशी अहवालात चिन्नास्वामीची रचना ‘सामूहिक मेळाव्यासाठी असुरक्षित’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर दिलेल्या वेळेत स्टेडियममध्ये सुधारणा करण्यात राज्य क्रिकेट संघटनेला अपयश आले. ‘आयसीसी’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यजमान संघटनेने स्पर्धा सुरू होण्याच्या ३० दिवस आधी हे स्थळ जागतिक संघटनेकडे सोपवणे आवश्यक आहे आणि त्या कालावधीत स्टेडियमवर इतर कोणतेही सामने आयोजित केले जाऊ शकत नाहीत.

चिन्नास्वामीवरील सामने अन्यत्र हलविताना कार्यवत्तोम (थिरुवनंतपुरम) येथील ग्रीनफिल्ड स्टेडियमचाही विचार झाला. मात्र, अखेरीस नवी मुंबईला पसंती देण्यात आली. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा तब्बल १२ वर्षांनंतर भारतात परतणार आहे. गेल्या काही वर्षांत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघाने ट्वेन्टी-२० आणि कसोटी सामने खेळले आहेत. आता या स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यांच्या यशस्वी आयोजनाचा विश्वास ‘आयसीसी’ने व्यक्त केला आहे.

‘‘अलीकडच्या काळात नवी मुंबई हे महिला क्रिकेटचे नवे घर झाले आहे. आंतरराष्ट्रीय सामने आणि महिला प्रीमियर लीगच्या सामन्यांना येथे चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरीची प्रेरणा मिळते. आता अशीच ऊर्जा महिला विश्वचषक स्पर्धेत पाहायला मिळेल याची खात्री आहे,’’ असेही ‘आयसीसी’च्या निवेदनात जय शहा यांनी नमूद केले.

पाच केंद्रांवर लढती

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील लढती नवी मुंबई, गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि कोलंबो या पाच केंद्रांवर रंगणार आहेत. स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असले, तरी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा संघ भारतात खेळणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये होणार आहेत. यात भारताविरुद्धच्या सामन्याचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या संघाने अंतिम फेरी गाठल्यास ही लढतही कोलंबो येथे होईल. अन्यथा अंतिम लढत नवी मुंबई येथे आयोजित केली जाईल.

भारताच्या लढती

वि. श्रीलंका (३० सप्टेंबर, गुवाहाटी)

वि. पाकिस्तान (५ ऑक्टोबर, कोलंबो)

वि. दक्षिण आफ्रिका (९ ऑक्टोबर, विशाखापट्टणम)

वि. ऑस्ट्रेलिया (१२ ऑक्टोबर, विशाखापट्टणम)

वि. इंग्लंड (१९ ऑक्टोबर, इंदूर)

वि. न्यूझीलंड (२३ ऑक्टोबर, नवी मुंबई)

वि. बांगलादेश (२६ ऑक्टोबर, नवी मुंबई)

नवी मुंबईतील लढती

श्रीलंका वि. बांगलादेश (२० ऑक्टोबर)

भारत वि. न्यूझीलंड (२३ ऑक्टोबर)

भारत वि. बांगलादेश (२६ ऑक्टोबर)

उपांत्य लढत-२ (नवी मुंबई)

अंतिम लढत (२ नोव्हेंबर)

(पाकिस्तान पात्र ठरल्यास अंतिम लढत कोलंबोत)