थिरुवनंतपुरम : वलयांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील विश्वविजेता अर्जेंटिना संघ नोव्हेंबर महिन्यात केरळमधील आपली मैत्रीपूर्ण लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. या सामन्याची अंतिम तारीख ठरली नसली, तरी सामना १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान कोणत्याही दिवशी कोची येथे होऊ शकतो, असेही केरळ राज्याच्या क्रीडा विभागातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.

अर्जेंटिना संघ व्यवस्थापनातील एक सदस्य बुधवारी सामन्याच्या केंद्राची पाहणी करण्यासाठी कोचीमध्ये येण्याची अपेक्षा आहे. अर्जेंटिना संघाच्या केरळ दौऱ्याविषयी काही वाद निर्माण झाले होते. या वर्षी ऑगस्ट महिन्यात अर्जेंटिना संघाचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, काही दिवसांनी अर्जेंटिनाकडूनच हा सामना नोव्हेंबरमध्ये खेळला जाईल असे सांगण्यात आले. मात्र, त्या वेळी प्रतिस्पर्ध्याचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. आता ऑस्ट्रेलियाचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राज्याचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमान यांनी केवळ अर्जेंटिना संघ केरळमध्ये येणार असल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.

लिओनेल स्कालोनी यांच्या मार्गदर्शनाखालील अर्जेंटिना संघ अन्यही देशांत मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. त्यातील एक सामना ६ ते १४ ऑक्टोबरदरम्यान अमेरिकेत खेळला जाणार आहे. या सामन्याचे केंद्र आणि प्रतिस्पर्धी संघ निश्चित नाही. दुसरा सामना नोव्हेंबरमध्ये अँगोला येथील लुआंडामध्ये होणार आहे. त्यानंतर अर्जेंटिनाचा संघ भारतात खेळेल. अर्जेंटिना संघाच्या या सामन्यानंतर लिओनेल मेसी डिसेंबरमध्ये स्वतंत्रपणे भारताच्या अनेक शहरांचा दौरा करणार आहे. यामध्ये कोलकाता, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली या शहरांचा समावेश असून, दिल्लीत तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणे नियोजित आहे.