तिसऱ्या डावापासून आत्मविश्वास उंचावलेल्या विश्वनाथन आनंदने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील पाचवा डाव बरोबरीत सोडविला. दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी २.५ गुण झाले आहेत.
आनंदला पाचव्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याचा फायदा मिळणार होता. अर्थात काळ्या मोहऱ्यांनीही कल्पक चाली करण्यात कार्लसन मातब्बर असल्यामुळे या डावाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आनंदने आक्रमक खेळ करत कार्लसनच्या राजावर सातत्याने दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्लसननेही तोडीस तोड उत्तर देत कार्लसनचे डावपेच हाणून पाडले. अखेर दोन्ही खेळाडूंनी ३९व्या चालीस डाव बरोबरीत सोडविला. पुढील दोन डावांत आनंदला काळ्या मोहऱ्यांसह खेळावे लागणार असून त्याला जपून चाली कराव्या लागतील.
आनंदने वजिरापुढील प्याद्याने सुरुवात केली. कार्लसननेहमी सुरुवातीस कॅसलिंग करत राजा सुरक्षित करतो, याचा प्रत्यय पुन्हा दिसून आला. पाचव्या डावातही त्याने १०व्या चालीला कॅसलिंग केले. आनंदने पुढच्या चालीला कॅसलिंग केले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी मधल्या दोन रांगांमध्येच आक्रमक चाली केल्या व एकमेकांचे मोहरे घेण्यावर भर दिला. आनंदने वजिराच्या रांगेत घोडा आणला. त्याऐवजी त्याने उंट अगोदर आणला असता, तर त्याला आक्रमक व्यूहरचनेसाठी अधिक वाव मिळाला असता. मात्र त्याऐवजी त्याने घोडय़ाची चाल खेळली.
२३ व्या चालीला आनंदकडे चार प्यादी, दोन हत्ती व एक उंट अशी स्थिती होती. कार्लसन याच्याकडे पाच प्यादी, दोन हत्ती, एक घोडा व एक वजीर अशी स्थिती होती. तांत्रिकदृष्टय़ा कार्लसन हा एका प्याद्याने वरचढ असला, तरी डावावर आनंदचेच नियंत्रण होते. आनंदने पुढच्या चालीला वजिरा-वजिरी केली. तेव्हाच त्याला डाव बरोबरीत ठेवायचा आहे, हे स्पष्ट झाले होते. तरीही दोन्ही खेळाडूंनी एकमेकांवर विविध डावपेच आखत दडपण आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या डावाप्रमाणे आनंदकडून काही अक्षम्य चुका झाल्यास आपल्याला त्याचा लाभ घेता येईल, अशीच कार्लसनची अपेक्षा होती. तथापि, पहिल्या दोन डावांमधील झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळायची, याच हेतूने आनंद चाली करीत होता. ३९व्या चालीला कार्लसनने आनंदचे एक प्यादे घेतले. त्या वेळी आनंद एक प्याद्याने मागे होता. पुढच्या चालीला कार्लसनचे प्यादे आनंद घेणार हे निश्चित होते. विजयाची संधी अंधुक असल्यामुळे आनंदने बरोबरी पत्करली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2014 रोजी प्रकाशित
आनंदची कार्लसनशी बरोबरी
तिसऱ्या डावापासून आत्मविश्वास उंचावलेल्या विश्वनाथन आनंदने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील पाचवा डाव बरोबरीत सोडविला. दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी २.५ गुण झाले आहेत.
First published on: 15-11-2014 at 04:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World chess championship anand draws game 5 with carlsen