दडपणाखाली खेळताना विश्वनाथन आनंदकडून अक्षम्य चुका घडतात, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. त्यामुळेच सहावा डाव जिंकून नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत ३.५-२.५ अशी आघाडी घेतली.
आनंदने तिसरा डाव जिंकून या स्पर्धेत आपल्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यानंतर त्याने लागोपाठ दोन डाव बरोबरीत ठेवत लढतीमधील रंगत वाढविली होती. मात्र सहाव्या डावात पराभव स्वीकारल्यानंतर पुन्हा तो बॅकफूटवर आला आहे. या उलट कार्लसनची बाजू पुन्हा वरचढ झाली आहे.
पांढऱ्या मोहरांनी खेळताना कार्लसनने राजापुढील प्याद्याने सुरुवात केली. सुरुवातीलाच दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ करीत वजिरा-वजिरी केली. त्यामुळे डावातील चुरस आणखीनच वाढली. १५व्या चालीला कार्लसनने कॅसिलग केले. त्यानंतर आनंदचे एक प्यादे घेताना त्याची दोन प्यादी एकाच रेषेत आली. तांत्रिकदृष्टय़ा कार्लसनसाठी ही गोष्ट त्रासदायक असली तरी त्यामुळे आनंदच्या उंटाच्या चाली मर्यादित राहिल्या. १८व्या चालीला कार्लसनकडे सात प्यादे, दोन हत्ती व दोन उंट अशी स्थिती होती. आनंदकडे त्यावेळी सात प्यादी, दोन हत्ती, एक उंट व एक घोडा अशी स्थिती होती. आनंदला या घोडय़ाचा अपेक्षेइतका फायदा घेता आला नाही.
 कार्लसनने उजव्या बाजूने दोन हत्तींच्या साहाय्याने जोरदार आक्रमण केले. त्यातच आनंदने आपले उजवीकडील प्यादे विनाकारण पुढे नेले. तसेच त्याने आपल्या प्याद्याला उंट किंवा हत्तीचे पाठबळ देण्याऐवजी उंट पुढे नेला. त्यामुळे कार्लसनला मोकळे रान मिळाले. त्यातच वेळेच्या बंधनात चाली करण्याच्या दडपणाखाली आनंदकडून एक दोन चाली चुकीच्या खेळल्या गेल्या. राजा सुरक्षित करण्याऐवजी त्याने कार्लसनचा उंट मिळविण्याचा प्रयत्न केला.
३४व्या चालीला कार्लसन हा दोन प्याद्यांनी वरचढ होता. ३८व्या चालीस त्याने आनंदच्या राजास शह दिला. त्यानंतर एकमेकांचे मोहरे गमावल्यानंतर कार्लसनच्या तीन प्याद्यांपैकी एक प्यादे वजीर होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर आनंदने लगेचच पराभव मान्य केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World chess championship despite blunder carlsen beats anand in game
First published on: 16-11-2014 at 07:28 IST