WC 2019 : रवी शास्त्रींची विल्यमसनबद्दल भावनिक पोस्ट, म्हणाले…

अंतिम सामन्यातील कोलाहलानंतर रवी शास्त्री यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे

यजमान इंग्लंडच्या संघाने विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून न्यूझीलंडवर विजय मिळवला. न्यूझीलंडने २४१ धावा करून इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक बाऊंड्री (चौकार-षटकार) मारण्याच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले.

अंतिम सामन्यात अनेक गोष्टी न्यूझीलंड संघाच्या विरोधात घडल्या. पण ‘जेंटलमन्स गेम’चा मान राखत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने आणि त्याच्या संघाने हसतमुखाने तो पराभव पचवला. बाउंड्रीच्या निकषावर सामन्याचा विजेता ठरवण्याच्या नियमावरून ICC वर प्रचंड टीका करण्यात आली. पण विल्यमसनने या सर्व गोष्टींबाबत मौन पाळले आणि खिलाडूवृत्ती दाखवत पराभवाचा स्वीकार केला. त्याच्या या वर्तणुकीमुळे नेटिझन्स आणि क्रिकेट जाणकार त्याच्यावर खूप खुश झाले. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही त्याचे कौतुक केले.

रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटमधून विल्यमसनवर स्तुतीसुमने उधळली आहेत. ‘अंतिम सामन्यात ज्या ज्या घटना घडल्या, त्या साऱ्या परिस्थितीमध्ये तू तुझा आत्मसन्मान आणि संतुलन राखलंस. अंतिम सामन्यातील त्या घटनांना तब्बल ४८ तासांहुनही अधिक काळ होऊन गेला, पण तरीही तू या सगळ्याबद्दल ज्या प्रकारे मौन राखले आहेस ते उल्लेखनीय आहे. तू केवळ केन नाहीस, तू केन आणि एबल (ब्रिटिश कादंबरी) दोन्ही आहेस. तू (न्यूझीलंड) देखील विश्वचषकाचा समान वाटेकरी आहेस हे आम्हां साऱ्यांना माहिती आहे’, अशा शब्दात रवी शास्त्री यांनी आपल्या विल्यमसन बद्दलच्या भावनांना वाट करून दिली.

दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World cup 2019 icc cricket final ravi shastri reaction kane williamson kane and abel vjb

ताज्या बातम्या