ICC Cricket World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेतील साखळी टप्प्यातील सर्व सामने संपले आहेत. आता उपांत्य फेरीतील सामने आणि फायनल रंगणार आहे. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चार संघ या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला उपांत्य सामना खेळवला जाईल. त्याच वेळी, दुसरा विश्वचषक सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १६ नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या दोन्ही सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल आणि त्यानंतर रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्या दोन संघांमध्ये सामना खेळवला जाईल.

आयसीसीने राखीव दिवसाच्या नियमांची पुष्टी केली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने पुष्टी केली आहे की, जर हवामानाच्या परिस्थितीत नियोजित दिवशी खेळ पूर्ण होऊ शकला नाही तर उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस वापरला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत उपांत्य आणि अंतिम सामन्याच्या राखीव दिवशी देखील पाऊस पडला तर काय होईल, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. या प्रकरणी आयसीसीने पुष्टी केली आहे की उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी प्रत्येकी एक दिवस राखीव दिवस ठेवण्यात आलेल्या दिवशी देखील जर सामना होऊ शकला नाही तर गुणतालिकेतील वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल.

हेही वाचा: Babar Azam: बाबर आझमच्या कर्णधारपदाबाबत कपिल देव यांचे सूचक विधान; म्हणाले, “९९ टक्के लोक म्हणतील त्याला हटवा पण…”

सर्व क्रिकेट चाहते त्यामुळे उपांत्य आणि अंतिम सामन्यांमध्ये पाऊस पडू नये अशी अपेक्षा करत आहेत. १५ नोव्हेंबर रोजी होणार्‍या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याचा राखीव दिवस १६ नोव्हेंबर असेल. त्याचवेळी, १६ नोव्हेंबर रोजी होणार्‍या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याचा राखीव दिवस १७ नोव्हेंबर असेल, तर १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याचा राखीव दिवस २० नोव्हेंबर असेल. याशिवाय, जर राखीव दिवशीही सामन्याचा निकाल लागला नाही, तर गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल. याचा फायदा टीम इंडियाला होणार कारण, गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: IND vs NZ, Semi-final: भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात पंच विक्रम करणार, ICCने सामना अधिकाऱ्यांची यादी केली जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९च्या विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला गेला होता आणि त्या सामन्यात देखील पावसाने अडथळा निर्माण केला होता, त्यानंतर तो सामना राखीव दिवशी पूर्ण झाला होता. ज्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने साखळी टप्प्यातील सर्व सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडने सुरुवातीला चांगले क्रिकेट खेळले, मात्र त्यानंतर सलग ४ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. आता या दोघांमध्ये उपांत्य फेरीची टक्कर कशी रंगणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.