वृत्तसंस्था, दोहा
कतारमधील प्रशासकांची मानवी हक्क, स्थलांतरित कामगार आणि अन्य काही या मुद्दय़ांवरील भूमिका, स्टेडियममधील बीअरबंदी या विषयांमुळे गेल्या काही काळात विश्वचषक फुटबॉल स्पर्धा मागे पडली आहे. मात्र, रविवारी यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्यासह ‘फिफा’ विश्वचषकाला प्रारंभ होणार असून त्यानिमित्ताने संपूर्ण जगाचे लक्ष कतारवर असेल.
अ-गटातील सलामीच्या लढतीत कतारविरुद्ध इक्वेडोरचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, ‘फिफा’ विश्वचषकांच्या सलामीच्या लढतींमध्ये यजमान देशांचे कायमच वर्चस्व राहिले आहे. त्यातच जागतिक क्रमवारीत कतारचा (५०व्या स्थानी) संघ इक्वेडोरपेक्षा (४४व्या स्थानी) केवळ सहा स्थानांनी मागे आहे. कतारच्या संघाला साधारण ६० हजार चाहत्यांचा पािठबाही लाभेल. याचा फायदा घेत कतारचा संघ पहिल्याच दिवशी धक्कादायक निकाल नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
कतारने बऱ्याच वर्षांपूर्वीच विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात केली होती. २०१९च्या कोपा अमेरिका आणि २०१९च्या आशियाई चषक स्पर्धेत कतारच्या संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धामध्ये कतारच्या खेळाडूंना अन्य आघाडीच्या खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी लाभली. हा अनुभव त्यांना विश्वचषकात फायदेशीर ठरू शकेल. मात्र, विश्वचषकाचे दडपण हे पूर्णपणे वेगळे असते. तुम्ही हे दडपण योग्य पद्धतीने हाताळल्यास आपल्याला यशस्वी कामगिरीची संधी आहे, असे प्रशिक्षक फेलिक्स सँचेझ यांनी कतारच्या खेळाडूंना सांगितले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत केलेल्या मेहनतीचे फळ कतारला या स्पर्धेत मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दुसरीकडे, दक्षिण अमेरिकन संघ इक्वेडोरचाही सलामीच्या लढतीत दर्जेदार कामगिरीचा प्रयत्न असेल. पात्रता फेरीत बचावपटू बायरन कॅस्टिलोला बेकायदेशीररीत्या संघात स्थान दिल्यामुळे इक्वेडोर संघापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु विश्वचषकासाठी त्याचा इक्वेडोरच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे वादांना मागे सोडून आता इक्वेडोरचा संघ केवळ विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करेल. गेल्या वर्षीच्या कोपा अमेरिका स्पर्धेत इक्वेडोरचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. मात्र, त्यांच्या संघात प्रतिभावान युवा खेळाडूंची संख्या मोठी असून विश्वचषकात चमक दाखवण्यासाठी ते उत्सुक असतील.
तुम्हाला हे माहीत आहे?
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत यजमान संघाला एकदाही सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागलेला नाही. यामध्ये सात विजयांचा समावेश आहे, तर तीन सामने बरोबरीत सुटले आहेत.
कतार या सामन्यामार्फत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करणार आहे. त्यांना इक्वेडोरला नमवण्यात यश आल्यास, कतार हा सेनेगलनंतर (२००२मध्ये) विश्वचषक पदार्पणात विजय मिळवणारा पहिला संघ ठरेल.
वेळ : रात्री ९.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, १ एचडी,
स्पोर्ट्स १८ खेल, जिओ सिनेमा