scorecardresearch

Premium

World Cup 2023: थ्रीडी प्लेयर विजय शंकर वर्ल्डकप खेळला आणि करिअरच संपलं…

World Cup 2023: चार वर्षांपूर्वी थ्रीडी प्लेयर म्हणून उल्लेख झालेल्या विजय शंकरचं करिअर वर्ल्डकपबरोबरंच संपुष्टात आलं.

vijay shankar
विजय शंकर थ्रीडी प्लेयर (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ वर्ल्डकप संघनिवडीवेळी सर्वाधिक चर्चा रंगली अंबाती रायुडूची निवड न होण्यायी. मधल्या फळीतील आक्रमक अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूला संघात स्थान मिळणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने रायुडूऐवजी अष्टपैलू विजय शंकरला संधी दिली. विजय शंकर वर्ल्डकपमध्ये मोजून तीन सामने खेळला. त्यानंतर सरावादरम्यान जसप्रीत बुमराच्या चेंडूवर तो दुखापतग्रस्त झाला. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने विजयची वर्ल्डकपवारी तिथेच संपुष्टात आली. नशिबाचा फेरा इतका वाईट की विजय त्यानंतर भारतीय संघासाठी खेळूच शकला नाही.

पत्रकार परिषदेत बोलताना एमएसके प्रसाद यांनी विजय शंकरचा उल्लेख ‘थ्रीडी’ असा केला. थ्रीडी अर्थात थ्री डायन्मेशनल खेळाडू. शंकर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात तिन्ही आघाड्यांवर योगदान देऊ शकेल या विचारातून त्याची संघात निवड केल्याचं प्रसाद म्हणाले. संघात निवड न झाल्यामुळे नाराज झालेल्या रायुडूने एक ट्वीट केलं. वर्ल्डकप पाहण्यासाठी थ्रीडी ग्लासेस ऑर्डर केले आहेत. विजय शंकरला उद्देशून हा टोमणा असला तरी तो प्रत्यक्षात एमएसके प्रसाद यांच्या निवडसमितीला होता. या ट्वीटमुळे रायुडूवर टीकाही झाली.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: मिचेल स्टार्कने किशनला बाद करत मोडला मलिंगाचा विक्रम, विश्वचषकात केला खास पराक्रम
England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
World Cup 2023: इंग्लंडच्या संघाने केला विश्वविक्रम! वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यादाच झाली ‘या’ खास पराक्रमाची नोंद
IND vs SL Highlights: India beat Sri Lanka by 41 runs made it to the final of Asia Cup Four wickets to Kuldeep
IND vs SL, Asia Cup: टीम इंडियाने केले लंका दहन! ४१ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत थेट फायनलमध्ये मारली धडक, कुलदीप चमकला
rachin ravindra
सचिन,राहुल नावात असणारा रचीन रवींद्र वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचं फिरकी अस्त्र

अनेक वर्षांनंतर रायुडूने या ट्वीटसंदर्भात खुलासा केला. तो म्हणाला, “माझ्याऐवजी निवडसमितीने रहाणे किंवा तत्सम अनुभवी खेळाडूची निवड केली असती तर मी समजू शकलो असतो. विजय तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अगदी नवीन होता. प्रत्येकाला भारतीय संघ जिंकावा असंच वाटतं. काही कारणांनी माझी निवड केली नाही. माझ्याऐवजी ज्याला संघात घेतलं त्याचा समावेश संघासाठी उपयुक्त ठरायला हवा होता. म्हणून मला राग आला. विजय शंकरबद्दल माझ्या मनात काहीच नव्हतं. तो काहीच करु शकत नव्हता. तो त्याचं खेळत होता. वर्ल्डकपसारखी मोठी स्पर्धा होती”.

विजय शंकरनेही ते ट्वीट खेळभावनेने घेतल्याचं स्पष्ट झालं. विजय म्हणाला, “वर्ल्डकपसारख्या स्पर्धेसाठी संघात निवड न होण्याचं दु:ख मी समजू शकतो. त्याच्या मनात माझ्याविषयी काहीच वाईट नव्हतं. भावनेच्या भरात त्याच्या हातून ट्वीट झालं”.

वर्ल्डकप आधी शंकरने ९ वनडे सामने खेळला होता. या छोट्या कालावधीत त्याने १६५ धावा केल्या होत्या आणि ४ विकेट्स पटकावल्या होत्या. बहुतांश सामन्यात त्याला फलंदाजीची संधीही मिळाली नव्हती. वर्ल्डकपपूर्वी विजय आंतरराष्ट्रीय सामने फार खेळलेला नसला तरी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो तामिळनाडूसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत होता.

वर्ल्डकप स्पर्धेत, सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विजय शंकर अंतिम अकरात नव्हता. पण दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला. मधल्या फळीतील राहुलने सलामीवीराची जबाबदारी स्वीकारली. यामुळे मधल्या फळीत शंकरसाठी जागा निर्माण झाली. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने १५ चेंडूत १५ धावा केल्या. गोलंदाजी करताना ५.२ षटकात २२ धावांच्या मोबदल्यात त्याने २ विकेट्स पटकावल्या.

अफगाणिस्तानविरुद्ध विजयला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. त्याने ४१ चेंडूत २९ धावांची संथ खेळी केली. गोलंदाजी करावीच लागली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धही विजय चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला आला. त्याने १९ चेंडूत १४ धावा केल्या. याही सामन्यात त्याला गोलंदाजी मिळाली नाही.

तीन सामन्यात विजयला दमदार अशी कामगिरी करता आली नाही. ज्या थ्रीडी कौशल्यांसाठी त्याला संघात घेतलं होतं ती कौशल्यं त्याला सिद्ध करता आली नाहीत. दोन सामन्यात तर गोलंदाजीच मिळाली नाही. यात भर म्हणजे सरावादरम्यान बुमराच्या चेंडूने विजयच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली. ही दुखापत बरी व्हायला तीन आठवडे लागणार असल्याने विजयचं वर्ल्डकप स्वप्न संपुष्टात आलं.

चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. विजयने तामिळनाडूचं यशस्वी नेतृत्व करताना डोमेस्टिक क्रिकेटमधल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत तसंच तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत तो खेळतो आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत महत्त्वपूर्ण योगदान देतो आहे. दुखापतींच्या ससेमिऱ्यातून बाहेर पडत त्याने पुनरागमन देखील केलं. पण भारतीय संघाचे दरवाजे विजयसाठी बंद झाले ते कायमचेच.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup player vijay shankar did not play for india again psp

First published on: 05-09-2023 at 11:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×