चेंडूपेक्षा वेगाने वाहणारे बोचरे वारे, हुडहुडी भरवणारी थंडी, तृणांच्या गालिच्याने नटलेली खेळपट्टी, अंगावर आदळणारे आणि स्विंग होणारे चेंडू, न्यूझीलंडचे हे वातावरण गोलंदाजांसाठी आल्हाददायक असले तरी फलंदाजांची कसोटी पाहणारे. याच न्यूझीलंडच्या रणांगणामध्ये आगामी विश्वचषक होणार असल्याने सध्याचा हा दौरा भारतासाठी विश्वचषकाची रंगीत तालीमच असेल. त्यामुळे या दौऱ्यात वातावरण, खेळपट्टीशी जुळवून घेण्याच्या अनुषगांने भारतासाठी हा दौरा नक्कीच महत्त्वाचा आहे.
न्यूझीलंडच्या भूमीवर भारताला आतापर्यंत देदीप्यमान वगैरे कामगिरी करता आलेली नाही. कारण भारताच्या पाटा खेळपट्टीवर पोसलेली भारताची फलंदाजी इथे लटपटताना बऱ्याच वेळा दिसली आहे. त्यामुळे भारताच्या सध्याच्या ‘ट्वेन्टी-२०’च्या मुशीत वाढलेल्या फलंदाजांचा न्यूझीलंड दौऱ्यावर फलंदाजी करताना खरा कस लागणार आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामधील एकदिवसीय मालिकेत भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली होती. भारतात द्विशतकी खेळी साकारणाऱ्या रोहित शर्माला डेल स्टेनची गोलंदाजी अनाकलनीय वाटत होती. पहिल्या १२ चेंडूंमध्ये तर त्याच्या बॅटने चेंडूला स्पर्शही केला नव्हता. शिखर धवन भारतामध्ये ‘रावडी राठोड’ सिद्ध झाला होता, पण पदलालित्याची वानवा त्याच्या खेळीत पाहायला मिळाली होती. धावांची ‘रन मशिन’ असलेल्या विराट कोहलीलाही दिमाखात फलंदाजी करता आली नव्हती. न्यूझीलंडचा संघ त्यांच्या मातीत ‘शेर’ असला तरी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीएवढा त्यांच्याकडे दर्जा आणि अनुभव नक्कीच नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर भारतासाठी हा दौरा जास्त आव्हानात्मक नसावा. सुरेश रैना सध्याच्या घडीला संघातला सर्वात अपयशी फलंदाज दिसत असून मिळणाऱ्या संधींचा अजूनही त्याला फायदा उठवता आलेला नाही. युवराज सिंग या दौऱ्यात नसल्याने आगामी विश्वचषकासाठी त्याच्या संघसमावेशाबाबत प्रश्नचिन्ह असेल. पण त्याच्या जागी संघात जागा मिळवल्यावर अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू किंवा स्टुअर्ट बिन्नी कशी कामगिरी करतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल. महेंद्रसिंग धोनीला विदेशात आपली छाप पाडता आलेली नाही, त्यामुळे त्याच्यासाठी हा दौरा एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून नक्कीच अभ्यासपूर्ण असेल. रवींद्र जडेजाने आतापर्यंत गोलंदाजीमध्ये कमाल केली असली तरी त्याच्या फलंदाजीला फॉर्मने गवसणी घातलेली नाही आणि हीच संघापुढील समस्या असेल. कारण युवराज हा फलंदाजीबरोबरच गोलंदाजीमध्येही संघाला यश मिळवून देत होता, त्याची जागा भरण्यात जडेजा नक्कीच अपयशी ठरला आहे.
न्यूझीलंडमध्ये गोलंदाजी हे कोणत्याही संघासाठी महत्त्वाचे अस्त्र असते. भारताच्या वेगवान गोलंदाजांना या वातावरणाचा अनुभव नसल्याने त्यांच्यासाठी हा दौरा बरेच काही शिकवून जाईल. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारतीय गोलंदाजांना क्विंटन डी कॉक आणि हशिम अमला यांना झटपट बाद करण्यात अपयश आले होते. या अनुभवातून जर गोलंदाज काही शिकले असतील तर या दौऱ्यात सुधारणा पाहता येईल. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारसारख्या युवा गुणवान गोलंदाजांवर भारतीय संघाची नजर असेल. तर इशांत शर्मा, वरुण आरोन, ईश्वर पांडे यांच्या गोलंदाजीला संघ व्यवस्थापन कसे वापरते, हेदेखील महत्त्वाचे असेल. या खेळपट्टय़ांवर फिरकीला जास्त मदत नसल्यामुळे आर. अश्विनसाठी हा दौरा खडतर असेल.
न्यूझीलंडच्या संघाला आतापर्यंत घवघवीत यश संपादन करता आलेले नाही. कारण त्याचा यशाचा आलेख जास्त काळ चढता राहिलेला नाही. सध्याच्या न्यूझीलंडच्या संघात अनुभवी फलंदाज आहेत, पण गोलंदाज दिसत नाही. त्याचबरोबर संघात डॅनियल व्हेटोरी नसल्याचा त्यांना मोठा फटका बसू शकतो.
गेल्या वेळी जेव्हा भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आला होता, त्या संघातील धोनी, झहीर खान आणि ईशांत शर्मा हे तिघेच सध्याच्या संघात आहेत. त्यामुळे अन्य खेळाडूंसाठी विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून हा दौरा बरेच काही शिकवून जाणारा असेल. कारण विश्वचषकाच्या दरम्यान संघाला वातावरण आणि खेळपट्टीशी जुळवून घेणे महत्त्वाचे असते. या दौऱ्यात भारतीय फलंदाजांना संयम आणि संयतपणा शिकावा लागेल. प्रत्येक चेंडू हा षटकार आणि चौकार ठोकण्यासाठी असतो, ही मानसिकता त्यांना बदलावी लागेल. आणि यामध्ये जर फलंदाज यशस्वी ठरले तर विश्वचषकात त्यांना चांगली कामगिरी करता येईल. वातावरण गोलंदाजीसाठी पोषक असले तरी यावेळी कशी गोलंदाजी करायची, याचा अनुभव गोलंदाजांना मिळेल. एकंदर भारतीय संघासाठी विश्वचषकाच्या दृष्टीने ही एक ‘अग्निपरीक्षा’ असेल. यामध्ये जो उत्तीर्ण होईल त्याला विश्वचषकात चांगली कामगिरी करता येईल.