सातत्यपूर्ण खेळाचा प्रत्यय घडविणाऱ्या भारतीय पुरुष संघाला जागतिक हॉकी लीगमध्ये रविवारी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर मात करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारतीय खेळाडू सर्वोत्तम कौशल्य दाखवतील असा आत्मविश्वास भारताचे प्रशिक्षक पॉल व्हॅन अॅस यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, ‘‘जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे तर आम्ही नवव्या क्रमांकावर आहोत.
ऑस्ट्रेलियाने गतवर्षी हेग येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत  नेदरलँड्सचा ६-१ असा धुव्वा उडविताना अंतिम फेरीतील सर्वात मोठय़ा विजयाचा विक्रम नोंदविला होता. लागोपाठ तीन वेळा विजेतेपद मिळविणारा तो पहिलाच देश आहे.
भारताने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे. येथे भारताने अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. युवा खेळाडूंचा समावेश असूनही भारताने येथे सातत्यपूर्ण खेळाचा प्रत्यय घडविला आहे. भारताचा कर्णधार सरदारसिंग म्हणाला, ‘‘अझलान शाह चषक स्पर्धेत आम्ही ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा फायदा येथे आम्हाला मिळेल. आमच्या संघात अनुभवी व युवा खेळाडूंचा समावेश असला तरीही आमच्या संघात अतिशय चांगला समतोल आहे. युवा खेळाडूंना आगामी ऑलिम्पिकसाठी आपले स्थान बळकट करण्यासाठी ही सोनेरी संधी असल्यामुळे ते येथे सर्वोत्तम कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करतील अशी मला खात्री आहे.’’
साखळी गटांत ऑस्ट्रेलिया नऊ गुणांसह आघाडीवर आहे. भारताने सात गुणांसह  दुसरे स्थान घेतले आहे. पाकिस्तानचे चार गुण असून त्यांना शेवटच्या सामन्यात फ्रान्सबरोबर खेळावे लागणार आहे. साखळी ‘ब’ गटांत यजमान बेल्जियम संघाने मलेशियावर २-० अशी मात करीत आघाडी स्थान घेतले आहे. त्यांचे सात गुण आहेत.