वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय अपंग खेळाडूंना घरच्या मैदानावर झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत विक्रमी २२ पदकांची कमाई केली. अखेरच्या दिवशी सिमरन, प्रीती पाल आणि नवदीप सिंग यांनी भारताच्या या यशस्वी मोहिमेची रुपेरी सांगता केली. भारताने स्पर्धेत सहा सुवर्ण, नऊ रौप्य, सात कांस्यपदके पटकावली. भारत पदकतालिकेत दहाव्या स्थानावर राहिला.
ब्राझीलने (१५ सुवर्ण, २० रौप्य, ९ कांस्य) एकूण ४५ पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवले. चीन १३ सुवर्ण आणि एकूण ५२ पदकांसह दुसऱ्या, तर इराण ९ सुवर्ण आणि एकूण १६ पदकांसह तिसऱ्या स्थानी राहिला.
महिलांच्या ‘टी १२’ विभागातील २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सिमरनने स्पर्धेतील दुसऱ्या पदकाची कमाई केली. तिने २४.४६ सेकंद वेळ देताना रौप्यपदक मिळविले. व्हेनेझुएलाच्या अलेहांद्रा पेरेझ लोपेझ हिला दृष्टीहीन खेळाडूंसाठी मार्गदर्शन धावक वापरण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे सिमरनला रौप्यपदक मिळाले. ब्राझीलच्या क्लासा बॅरोस डी सिल्वा हिने २४.४२ सेकंद वेळ देत सुवर्णपदक पटकावले. सिमरनने यापूर्वी याच विभागातील १०० मीटर धावण्याची शर्यत जिंकली आहे. ‘‘घरच्या स्पर्धेत आशियाई विक्रम मोडताना दोन पदके जिंकल्याचा मला आनंद आहे,’’ अशी प्रतिक्रिया सिमरनने व्यक्त केली.
महिलांच्या ‘टी ३५’ विभागातील २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रीती पाल चीनच्या गुओ कियानकियानला आव्हान देऊ शकली नाही. त्याामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या ‘एफ ४१’ विभागातील भालाफेक प्रकारात भारताच्या नवदीप सिंगला ४५.४६ मीटरच्या कामगिरीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नवदीप पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. इराणच्या सादेह बेट सयाह याने ४८.८६ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले.
पंतप्रधानांकडून कौतुक
भारतीय खेळाडूंच्या जागतिक पॅरा स्पर्धेतील ऐतिहासिक यशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. ‘‘स्पर्धेतील आजपर्यंतचे सर्वोत्तम यश तुम्ही मिळविले. तुमची कामगिरी देशातील तरुणांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल,’’ अशा मोदी यांनी समाजमाध्यमांवर लिहिले. ‘‘संघातील प्रत्येक सदस्याचा मला अभिमान वाटतो. तुम्हा सर्वांना भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा,’’ असेही मोदी म्हणाले.