‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्याबाबत रिकी पॉन्टिंगचे मत

पीटीआय, लंडन

World Test Championship Final 2023 ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच खेळ उंचावणारा चेतेश्वर पुजारा आणि पुन्हा सूर गवसलेला विराट कोहली या भारतीय फलंदाजांना रोखण्यात यश आले, तरच ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत जिंकणे शक्य होईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले. पुजारा आणि कोहलीची ऑस्ट्रेलियाला धास्ती असेल, असे पॉन्टिंगला वाटते.

पुजारा गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत ससेक्स संघाकडून खेळत होता. त्यामुळे तो इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्टय़ा यांबाबत भारतीय संघातील सहकाऱ्यांना मोलाचा सल्ला देऊ शकेल. तसेच कोहलीला पुन्हा सूर गवसला असून त्याने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून खेळताना दोन शतके आणि सहा अर्धशतके साकारली.

‘‘ऑस्ट्रेलियन संघ विराट आणि पुजारा यांच्याबाबत बरीच चर्चा करत असेल. या दोघांची ऑस्ट्रेलियन संघाला धास्ती असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशेषत: ऑस्ट्रेलियात पुजाराने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ‘डब्ल्यूटीसी’चा अंतिम सामना ओव्हलच्या मैदानावर होणार असून तेथील खेळपट्टीही ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांप्रमाणेच असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे पुजाराला लवकर बाद करण्याचे लक्ष्य असेल,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.

‘‘विराट आता पुन्हा सर्वोत्तम लयीत आहे आणि याची ऑस्ट्रेलियाला कल्पना असेल. आपण आता सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या जवळ आहोत असे विराटने मला सांगितले आहे. त्यामुळे त्याच्यापासून ऑस्ट्रेलियाला सावध राहावे लागेल,’’ असेही पॉन्टिंगने नमूद केले. ‘आयपीएल’पूर्वी मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात कोहलीने १८६ धावांची खेळी केली होती.

भारताला मानसिकता बदलण्याची गरज -हेडन

भारतीय संघाला २०१३ सालापासून ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही. दोन वर्षांपूर्वी ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. यंदा ऑस्ट्रेलियाला नमवून ‘डब्ल्यूटीसी’चे जेतेपद पटकवायचे झाल्यास भारताने मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनला वाटते. ‘‘भारतीय खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि कौशल्याची कमतरता नाही. आता प्रश्न मानसिकता आणि संधीचा आहे. भारतात क्रिकेट सर्वात लोकप्रिय खेळ असून खेळाडूंवर फार दडपण असते. जागतिक स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय खेळाडूंना मानसिकता बदलावी लागेल. भारतीय संघाने अंतिम निकालाचा विचार न करता केवळ प्रक्रियेवर लक्ष दिले पाहिजे,’’ असे हेडनने सांगितले.

स्मिथ, कोहलीला बाद करणे गरजेचे -फिंच

भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांचे ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यातील यश विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाने या दोघांना लवकर बाद करणे गरजेचे आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचने व्यक्त केले. ‘‘कोहली आणि स्मिथ हे दोघेही आपापल्या संघांसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतात. त्यामुळे त्यांना लवकर बाद करण्याचा प्रतिस्पर्धी संघाचा प्रयत्न असेल. या दोघांमध्ये स्मिथ अधिक चांगली कामगिरी करेल असे मला वाटते,’’ असे फिंच म्हणाला.